साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीने कारखानदारी अडचणीत : यशवंत कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 08:27 PM2018-09-14T20:27:22+5:302018-09-14T20:30:36+5:30
साखर निर्यातीमध्ये ९०० रुपयांची तूट; इथेनॉलला उठाव कमी
श्रीपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव प्रति क्विंटल २ हजारापर्यंत आहेत़ साखर कारखानदारांनी बँकेकडून त्या साखरेवर २९०० रुपयांप्रमाणे कर्ज घेतले आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर ९०० रुपयांची तूट कारखानदारांना सहन करावी लागणार आहे़ शिवाय इथेनॉल निर्मिती केली तर भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉल वापरले जाते़ त्यामुळे त्याचा उठाव कमी आहे़ या दोन्ही बाबी लक्षात घेता साखर उद्योग भविष्यात संकटात सापडतील, असे मत श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दरात वाढ केली़ शिवाय साखरेला २९०० हमीभाव जाहीर केला, या पार्श्वभूमीवर यशवंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मागील दोन वर्षांचा ऊस व साखर उत्पादनाचा आढावा घेतला तर हंगाम २०१६-१७ मध्ये देशांतर्गत २०३ लाख टन साखर उत्पादन झाले.
२०१७-१८ मध्ये मोठी वाढ होऊन ते ३२० लाख टनावर गेले. येणाºया गळीत हंगामात देशांतर्गत ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात ११५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच देशातील एकूण साखर खप लक्षात घेता १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. त्यामुळे देशात साखरेचे दर कमी होणार याची भीती साखर उद्योगास असल्याचेही कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कारखानदरीला उभारी येण्यासाठी शासनाने त्यासाठी साखर निर्यात व इथेनॉल निर्मिती भर द्यावा असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रात साखरेचा दर २९०० रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो दर २००० रुपये आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर एका पोत्यामागे ९०० रुपयांची तूट कारखानदाराला सोसावे लागते, पण निर्यातीसाठी सरकार अनुदानाची रक्कम ५५ रुपये प्रति टन दोन वर्षानंतर देते़ ते कमी प्रमाणात आहे़ त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बी हेवी मोलासेसपासून बनणाºया इथेनॉलला ५ रुपये दर वाढवून दिला आहे. त्यामुळे बी हेवी मोलासेस इथेनॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा कारखान्यास बसवावी लागेल़ भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉलचा वापर होत असल्यामुळे याचा उठाव कमी आहे़ ते इथेनॉल साठवण्यासाठी कारखानदारांना अधिक आर्थिक भार पडतो़ त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़ परिणामी अडचणी वाढण्याची शक्यता आहे़ त्यासाठी शासनाने निर्यात अनुदानामध्ये वाढ करावे व इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवावे तर कारखानदारांना याचा आर्थिक फायदा होईल अन्यथा मोठे संकट असल्याची भीती यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली़