राज्यातील कला केंद्र, आठवडी बाजारासह यात्रा लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:56+5:302021-09-05T04:26:56+5:30
अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना महासंघाचे निवेदन ...
अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना महासंघाचे निवेदन दिले. यावेळी अरुण मुसळे, उमेश काळे, किरण आंधारे उपस्थित होते.
दरम्यान देशमुख म्हणाले, राज्यातील तमाशा, लावणी आणि लोककलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.
लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, अधिवेशनाच्या काळात पारंपरिक लावणी कलावंतांचा राजस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृद्ध कलावंतांना मानधनामध्ये वाढ मिळावी, राज्यातील पारंपरिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे ५ एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्यविभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या बैठकीदरम्यान अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.