होय..मनात आणलं तर आम्ही कोरोनाला हरवू शकतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:06 PM2020-04-29T15:06:07+5:302020-04-29T15:12:43+5:30
सोलापूरकरांकडून स्वयंशिस्तीचा आदर्श; अनेक मंडईमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवून भाजी खरेदी; काही ठिकाणी पोलिसांना करावा लागला बळाचा वापर
सोलापूर : सलग चार दिवसांनंतर घराबाहेर पडलेल्या हजारो सोलापूरकरांनी मंगळवारी सकाळी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. बहुतांश भाजी मंडईमध्ये चार फूट अंतर ठेवून खरेदी केली गेली. मनात आणले तर आम्ही सोलापूरकरही कोरोनाला हरवू शकतो, याची जाणीवच जगाला करुन दिली.
भाजीपाला खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आल्याने सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नागरिकांची झुंबड उडाली होती. काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे तर काही मार्केटमध्ये पालन होत असल्याचे निदर्शनास आले. मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून बहुतांश विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची सोय केली होती. पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीकरवरून सूचना दिल्या जात होत्या.
कस्तुरबा मार्केट येथे सकाळी ८ वाजताच नागरिकांनी गर्दी केली होती. भाजी विक्रेतेही सकाळी ७ वाजता आले होते. वेळेच्या आत गर्दी होत असल्याचे पाहून पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना मज्जाव केला. नागरिकांनाही मार्केट १० वाजता सुरू होणार आहे, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले. १० वाजता मार्केटला सुरुवात झाली.
६ पहाटे चारपासूनच मार्केट यार्डामध्ये आज भाजीपाला लिलावास सुरुवात झाली. पोलिसांनी मार्केट यार्डाचे सर्व रस्ते बंद केले. लिलावात भाग घेणाºया सर्व भाजी विक्रेत्यांना रांगेने फिजिकल डिस्टन्स ठेवत आत सोडण्यात येत होते. पहाटे चार ते सकाळी आठपर्यंत लिलाव प्रक्रिया चालू होती. साडेआठ वाजता सर्व भाजी विक्रेत्यांना फिजिकल डिस्टन्स ठेवत बाहेर सोडण्यात आले.
६ मंडईतील गर्दी कमी करण्यासाठी बाळीवेस स्टेट बँक ते सम्राट चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांना बसण्याची सोय करण्यात आली होती. ग्राहकांना फिजिकल डिस्टन्स पाळता यावे, यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. ग्राहक शिस्तबद्धरित्या भाजी खरेदी करताना दिसत होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देण्यात येत होत्या.
मागील वेळी फिजिकल डिस्टन्सचा पूर्णत: बोजवारा उडाला होता. यंदा मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त लावून भाजी विक्री आणि खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना शिस्त लावली.
लोकांनी तोंडाला बांधले मास्क....
- मार्केटमध्ये आलेल्या नागरिकांनी आपल्या तोंडाला मास्क लावले होते. मास्क लावलेला नसेल तर पोलीस लावण्यास सांगत होते. हे पाहून अनेकजण मास्क नसेल तर रुमाल तोंडाला बांधत होते. मार्केट भरलेल्या परिसरात एकाही दुचाकी, तीनचाकी रिक्षाला परवानगी दिली जात नव्हती. मार्केटमध्ये एका वेळी फक्त एका व्यक्तीला प्रवेश दिला जात होता.
मैदानावर पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक
- शरदचंद्र पवार शाळेच्या मैदानावर भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात आली होती. सकाळी १० वाजता मैदानावर फिजिकल डिस्टन्स ठेवण्यास सांगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन स्थानिक नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी केले. यावेळी भाजी विक्रेत्यांनी व ग्राहकांनी टाळ्या वाजवून पोलिसांचे स्वागत केले. पोलिसांच्या कार्याला आमची साथ आहे, अशी भावना टाळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली.
पूर्व भागात मात्र पोलीस हैराण
- भाजीपाला खरेदीकरिता फिजिकल डिस्टन्सच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत सोलापुरातील बहुतांश ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला होता. नीलम नगर येथील प्रिसिजन फॅक्टरीसमोर लागलेल्या भाजी मार्केटमध्ये लोक दाटीवाटीने खरेदी करताना दिसले. जिल्हा परिषद शाळेसमोर भाजी मार्केट भरविण्याचे नियोजन होते. जिल्हा परिषद शाळेसमोर फिजिकल डिस्टन्सिंगचे रिमार्कही करण्यात आले होते.