वर्षाचा प्रारंभ पांडुरंगाच्या दर्शनाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:05+5:302021-01-02T04:19:05+5:30
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंदिर समितीच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करून येणाऱ्या मोजक्याच भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन ...
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंदिर समितीच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करून येणाऱ्या मोजक्याच भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन उपलब्ध आहे. असे असले तरी वर्षाचा पहिला दिवस पांडुरंगाच्या पावन नगरीत जावा, या उद्देशाने भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. विठ्ठलाचे मुखदर्शन मिळाले नाही, तरी चंद्रभागेचे स्रान करून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भाविक समाधानी होत होते.
नवीन वर्षानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्याची आळंदी येथील विठ्ठलभक्त प्रदीप प्रकाश ठाकूर यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांना देवाची सेवा करण्याची संधी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास त्याचबरोबर संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.
या सजावटीसाठी झेंडू, जलबेरा, शेवंती व गुलछडी या फुलांची रंगसंगती करून आरास करण्यात आली होती. यासाठी किमान १ टन फुले वापरण्यात आली आहेत. आरास करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसह खासगी संस्थेने केले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.