यंदा नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जित करणार नाहीत पंढरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:27 AM2021-09-12T04:27:12+5:302021-09-12T04:27:12+5:30
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, जलप्रदुषण टाळावे यासाठी गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता नगर परिषदेच्या कर्मचा-यांकडे जमा ...
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, जलप्रदुषण टाळावे यासाठी गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता नगर परिषदेच्या कर्मचा-यांकडे जमा केली जाणार आहे. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेचे कर्मचारी नेमले गेल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
गणेशोत्सवाची सांगता करताना मूर्ती विसर्जनाच्या कालावधीत नदीपात्रात नागरिकांची गर्दी होऊ शकते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे १६ ते २० सप्टेंबर विसर्जन काळात गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी शहरात १३ ठिकाणं निश्चित केली आहेत. या ठिकाणी कर्मचा-यांचीही नेमणूक केली आहे. नागरिकांनी घरातील व मंडळांची मूर्ती नगर परिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी मंडपामध्ये नेऊन द्यायच्या आहेत. त्याचबरोबर निर्माल्यही त्याचठिकाणी स्वीकारले जाणार आहे. नगर परिषद प्रशासन नदीपात्राचे प्रदूषण होणार नाही. याबाबत उपाययोजना करत असल्याचे नगर परिषदेचे नगर अभियंता नेताजी पवार यांनी सांगितले.
---
गर्दी केल्यास होईल कारवाई
गणेशमूर्तीचे विसर्जन दरम्यान सर्वसामान्यांची गर्दी होऊ नये म्हणून पाेलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. गर्दी करणा-या मंडळांच्या पदाधिका-यांवर व नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पंढरपूर उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.
---
येथे होणार गणेशमूर्ती संकलन
अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोल पंपासमोर , के. बी. पी. कॉलेज चौक बस स्टॉपजवळ, प्रबोधनकार ठाकरे चौक, सार्वजनिक बांधकाम विभागालगत, स्वा. सावरकर चाैक गजानन मेडिकलसमोर, शिवतीर्थ छत्रपती शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकीजवळ, मुक्ताबाई मठासमोर, अंबाबाई पटांगणासमोर विठ्ठल मोबाईल शॉपीजवळ, यमाई तलाव गेटजवळ टाकळी रोड.