कॉर्पोरेट टेक्स्टाइल कंपन्यांकडे वर्षभराचे बुकिंग; सोलापूच्या उद्योजकांकडे मात्र कामच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:32 PM2020-12-19T12:32:14+5:302020-12-19T12:34:27+5:30
आधुनिकीकरणाचा अभाव : चादर उत्पादन घटले, निर्यातही घसरली
सोलापूर : मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या टेक्स्टाइल उद्योगात प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे वर्षभराच्या ऑर्डर्सचे बुकिंग झाले आहे. मागील ५० वर्षांहून अधिक काळ टेक्स्टािल उद्योग जगात अधिराज्य गाजवणाऱ्या सोलापुरातील उद्योजकांकडे मात्र कामच नसल्याचे या उद्योगातील जाणकारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
टेक्स्टाइल उद्योगात अत्याधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोलापुरात मात्र ५ ते १० टक्के उद्योजक अत्याधुनिकीकरणाकडे वळाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या तुलनेत येथील उद्योजक अत्याधुनिकीकरण, गुणवत्ता, मार्केटिंग आणि नावीन्यते मागे असल्यामुळे ऑर्डर्सचा ओघ कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
सातासमुद्रापार गेलेल्या सोलापुरी चादरीचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटले आहे. सोलापूरचा टेक्स्टाइल उद्योग वाचवायचा असेल तर आधुनिक करण्याशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आधुनिकीकरणात सतत मागे राहणाऱ्या उद्योजकांबद्दल येथील अभ्यासू उद्योजकांनी चिंता व्यक्त केली आहे. सूताचे दर वाढले म्हणून उद्योजकांनी टॉवेल व चादरीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ करताना उद्योगाच्या भविष्याविषयी चिंतादेखील व्यक्त होणे अपेक्षित होते. ५० टक्क्यांनी घसरलेली उलाढाल वाढविण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहेे, असेही अभ्यासकांनी सांगितले.
उद्योजकांनी टेक्स्टाइल इंडस्ट्रीला लघु प्रकल्पातच कैद करून ठेवले आहे. पारंपरिक उत्पादन प्रक्रियेतून येथील उद्योजकांना बाहेर पडता आलेले नाही. बोटावर मोजण्याइतकेच उद्योजक अत्याधुनिकीकरणाकडे वळले आहेत. ७० ते ८० टक्के उद्योजक अजूनही पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेत आहेत. त्यांच्या गुणवत्तेत सातत्य राहिले नाही. सामूहिक मार्केटिंगचा अभाव आहे.
-पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ
..तर उद्योग रसातळाला जाईल !
पूर्वीप्रमाणे देश-विदेशांतून ऑर्डर्स आता येत नाहीत. एखादी मोठी ऑर्डर आल्यास तिचा पुरवठा लवकर करता येत नाही. कारण आपल्याकडे सामूहिक उत्पादन प्रक्रिया नाही. सामूहिक मार्केटिंग यंत्रणा नाही. सध्याचे युग ऑनलाइनचे आहे. तीन ते पाच टक्केच उद्योजक ऑनलाइन व्यवसायाकडे वळले आहेत. अद्याप ८० टक्के उद्योजक पॉवरलूमवर उत्पादन घेतात. गुणवत्तेत सातत्य नाही. याचा फायदा कॉर्पोरेट कंपन्या घेत आहेत. आपणही कॉर्पोरेटच्या दिशेने पाऊल टाकणे गरजेचे बनले आहे. अन्यथा उद्योग रसातळाला जाईल.
राजेश गोसकी -
अध्यक्ष, टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन