यंदा प्रथमच सोलापूरच्या तापमानाचा पारा ४२.८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:37 PM2019-04-04T14:37:02+5:302019-04-04T14:38:57+5:30
गतवर्षीपेक्षा यंदा सुरुवातीपासूनच सातत्याने सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू आहे.
सोलापूर: मार्च महिन्यातली गत आठवड्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ताजी असतानाच बुधवारी एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच या वर्षातल्या सर्वोच्च ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथील हवामान खात्याच्या प्रयोगशाळेत झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सुरुवातीपासूनच सातत्याने सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्यावर्षी २ मे ४३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले होते. अद्याप मे महिना उजाडायचा आहे. यावर्षी एप्रिलच्या प्रारंभीच पारा ४३ अंशाकडे वाटचाल करत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर मे अखेरपर्यंत सोलापुरातील गेल्या तीस वर्षांतील उच्चांकी तापमानाचा विक्रम मोडला जाईल, अशा प्रतिक्रिया शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.
दरवर्षी मे महिन्यामध्ये ४४ अंशावर नोंदले जाणारे तापमान यंदा एप्रिलमध्ये नोंदले जाते की काय, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे रुग्णालयामध्ये उपचार घेणाºया बाल व वृद्ध रुग्णांवर याचा परिणाम होऊ लगला आहे. उन्हापासून बचावासाठी कार्य करणारे फॅन, कूलरही काम करेनासे झाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू आहे. पर्यावरणाचा समतोल विस्कळीत होऊ लागल्यामुळेच हे चित्र निर्माण होत आहे. यासाठी ‘झाडे लावून त्यांचे संगोपन करायला हवे, अन्यथा पुढचा काळ याहून अधिक तीव्र असेल, अशा प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
२००५ ची पुनरावृत्ती होणार ?
- सोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले आहे. यावर्षीची स्थिती पाहता यंदा त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा झालेले पर्जन्यमानही त्याला कारणीभूत असावे असे म्हटले जात आहे. एप्रिल, मे असे दोन महिने अद्याप उन्हाळा असल्यामुळे यंदा तापमानाचा २००५ सालातला उच्चांक मोडला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.