‘होय, मी आहेच मूर्ख’असा फलक लावूनही ई-टॉयलेट भोवतीच फेकला जातोय कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:43 PM2019-06-03T13:43:01+5:302019-06-03T13:49:31+5:30
स्मार्ट सोलापूरमधील व्यापाºयांच्या दुकानातील कर्मचाºयांचा प्रताप; सुशिक्षितांकडून टॉयलेटच्या भोवतीच लघुशंका
संतोष आचलारे
सोलापूर : सोलापूर शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून होत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील रस्ते, बाग बगीचे, चौक स्वच्छ व सुंदर होत आहेत. स्मार्ट सिटीच्या नव्या कामांचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे विविध ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या ई-टॉयलेटच्या भोवती कचरा फेकला जात आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित असणाºया काही नागरिकांकडून ई-टॉयलेटच्या भोवतीच लघुशंका करण्याचा प्रकार होत असल्यानेही स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडत आहे. विशेष म्हणजे लोकांनी असे करू नये म्हणून ‘होय, मी आहेच मूर्ख’ असा फलक प्रशासनाने लावलेला असतानाही हे प्रकार घडत आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत पार्क चौकातील पार्क स्टेडियम, सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील होम मैदान, सिद्धेश्वर पेठ पोलीस चौकीच्या समोर व जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था निर्माण करून देण्यात आली आहे. या ठिकाणी शहरातील विविध दुकाने व कार्यालयातील कचरा तेथील कर्मचाºयांकडून टाकण्यात येत आहे.
स्वच्छ व सुंदर दिसणाºया टॉयलेटमध्ये प्रवेश करताना नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडतो; मात्र नाणे टाकून लघुशंका करण्यास अनेकांचा निरुत्साह दिसून येत आहे. ई-टॉयलेटच्या भोवतीच काही उद्धट नागरिकांकडून लघुशंका करण्याचाही प्रकार होत असल्याने अशा नागरिकांबाबत सुज्ञ नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सिद्धेश्वर मंदिराच्या समोर व पासपोर्ट कार्यालयाच्या समोर असलेल्या दोन ठिकाणच्या ई-टॉयलेटभोवती तर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी खोदाई काम करणाºया कर्मचाºयांनाही या ठिकाणी काम करणे अवघड झाले आहे. स्मार्ट टॉयलेटची सुविधा असतानाही सभोवताली मात्र दुर्गंधीच दुर्गंधी पसरली गेली आहे. त्यामुळे सूज्ञ नागरिकांना त्याचा वापर करणे आव्हानाचे झाले आहे.
होय, मी आहेच मूर्ख....
- पार्क चौकात उभारल्या गेलेल्या ई-टॉयलेटच्या भोवती कचरा टाकणाºया व उघड्यावर लघुशंका करणाºया नागरिकांना यापासून परावृत्त करण्यासाठी मी एक मूर्ख असा फलक लावण्यात आला आहे. तरीही काही नागरिक तो फलक वाचल्यानंतरही आपले कृत्य सुरुच ठेवत असल्याने होय, मी आहेच मूर्ख अशी टिपणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.
दुकान मालकांची जागृती हवीच
- पार्क चौक, सिद्धेश्वर पेठ, रंगभवन, डफरीन चौक, होम मैदान आदी परिसर स्वच्छ व सुंदर होत आहे. असे असताना ई-टॉयलेटभोवती कचरा साचत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. विविध प्रकारचे दुकाने, कार्यालये व हॉटेलमधील कचरा या ठिकाणी टाकण्याचा प्रकार होत आहे. आपल्या आस्थापनेतील कचरा कर्मचारी नेमका टाकतो कुठे याची पडताळणी मालकांनी करावी. स्वच्छ व सुंदर सोलापूरसाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तरच सोलापूर खºया अर्थाने स्मार्ट होईल अशी प्रतिक्रिया राजेशकुमार पाटील या युवकाने दिली.