गॅस सिलिंडर नको गं बाई, आपली चुलच परवडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:16+5:302021-04-06T04:21:16+5:30
जीवनावश्यक वस्तूंसह सिलिंडरच्या किमती वाढल्याने अशा महागाईत जगायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांना सतावत आहे. महिलांना धुरापासून, चुलीपासून मुक्ती ...
जीवनावश्यक वस्तूंसह सिलिंडरच्या किमती वाढल्याने अशा महागाईत जगायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांना सतावत आहे.
महिलांना धुरापासून, चुलीपासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर देण्यात आले. मात्र, टप्प्याटप्याने दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे.
एप्रिलच्या एक तारखेला घरगुती गॅस सिलिंडरचे दर ८६१ रुपयांवर स्थिरावले. गेल्या पाच महिन्यात सिलिंडरचे दर २२५ रुपयांनी वाढवले अन् १० रुपयांनी स्वस्त केल्याने सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गॅस सिलिंडरसह स्वयंपाक घरातील जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरीब व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोना महामारीमुळे प्रत्येक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. दुसरीकडे सिलिंडरची किंमत ८६१ रुपयांवर गेल्याने सर्वसामान्य जनतेची आर्थिक गाडी रुळावरून घसरली आहे.
गॅस सिलिंडर टाकले अडगळीत
पूर्वी गॅस सिलिंडरवर बेस व्हॅल्यूनुसार सबसिडी मिळायची. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून १० रुपये सबसिडी मिळत असल्याने केंद्र सरकारने सबसिडी संपविण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिलिंडरचा दर ६५० रुपये होता. आता सिलिंडरचा दर ८६१ रुपयांवर पोहोचला असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबानी गॅस सिलिंडर अडगळीत टाकले असून, पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.
गरिबांना गॅस वापरणे गेले आवाक्याबाहेर
सिलिंडरच्या दरवाढीमुळे राहणीमानाचा आलेख उलट पद्धतीने सुरू आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसह सर्वसामान्य कुटुंबांनी गॅस असूनही चुलीवर स्वयंपाक करण्यास प्राधान्य दिले आहे. सिलिंडरच्या दरवाढीमुळे हातावरचे पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे हाल होत असून सिलिंडर वापरणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.