पाय खरडत खरडत दुचाकीस्वार सांभाळताहेत आपला तोल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:21 PM2019-07-01T12:21:13+5:302019-07-01T12:23:27+5:30
सोलापुरातील रंगभवन ते सात रस्ता; रस्त्याच्या मध्येच खोल खड्ड्याने वाहनधारकांचे हाल
सोलापूर : रंगभवन ते सात रस्ता येथील बस डेपोपर्यंत विकासकामांसाठी रस्त्यावर दोन्ही बाजूने मधोमध खड्डा पाडण्यात आला आहे. या खड्ड्यात मातीच माती असल्याने दुचाकीस्वारांचा तोल सुटत आहे. वाहतुकीतून दुचाकी पुढे घेताना त्यांना पाय खरडत खरडतच तोल सांभाळून पुढे जाण्याची वेळ आली आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख भागात विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार रंगभवन ते सात रस्ता येथील रस्त्यावरील दोन्ही बाजूने ड्रेनेजच्या कामासाठी मागील महिनाभरात खड्डा पाडून काम करण्यात आले आहे. त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्येच खड्डा भरला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याशिवाय विविध शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांचा प्रवास या मार्गावरून होतो. रंगभवन परिसरातील चर्चनजीक तर अजूनही काम सुरू असल्याने रस्ता अर्धा बंद करण्यात आला आहे. अर्ध्या रस्त्यावरही खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना येथून वाहने हाकताना प्रचंड सावधानता बाळगावी लागत आहे.
सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत तर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक ठप्प होत आहे. विद्यार्थी, कर्मचारी दुचाकी घेऊन येथून जात असताना मध्येच जड वाहनेही येत असल्याने या ठिकाणी वाहतूक सातत्याने ठप्प होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना तर अपुºया व असुरक्षित रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
सात रस्ता येथे बस डेपो असल्याने बसचीही वर्दळ या ठिकाणी असते.याशिवाय एसटी बसेसही या मार्गावरुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक चांगलीच व्यस्त झाली आहे. एका बाजूने कामासाठी रस्ता बंद तर दुसºया बाजूला रस्त्याच्या मधोमधच खड्डा पाडला गेल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करण्याची वेळ आली आहे.
उड्डाणपूल होणार तरी कधी ?
- सोलापूर शहरात रंगभवन परिसरात उड्डाणपूल होणार असे सातत्याने कानावर येत आहे; मात्र प्रत्यक्षात तसे काहीच दिसून येत नाही. या चौकाचे लुक अत्यंत चांगले झाले आहे. त्याचप्रमाणे येथील रस्त्याच्या लूक दिसावा. उड्डाणपुलाचे काम नक्की होणार तरी कधी असा प्रश्न सुमित कांबळे याने उपस्थित केला.
विकासकामे व्हावीत पण वेठीस धरून नव्हे
- स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख व्हीआयपी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामामुळे शहराचा निश्चित विकास होणार आहे; मात्र ही कामे करताना सध्या असलेली व्यवस्था अडचणीत आणून नागरिकांना धोका होईल असे काम करणे उचित ठरणार नाही. रस्त्यावर खड्डे मारल्यानंतर हे खड्डे तरी किमान डांबराने बुजवून घेण्यात यावेत अशी प्रतिक्रिया शैलेश जाधव या युवकाने दिली.