गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला
By काशिनाथ वाघमारे | Published: July 30, 2023 09:27 PM2023-07-30T21:27:49+5:302023-07-30T21:30:22+5:30
ग्रामस्थ धावले : खैराट येथे पाण्यात बुढून तरुण शेतक-याचा मृत्यू
सोलापूर : गवताला फवारायला पाणी आणायला शेतातील विहिरीत उतरलेला शेतमजूर तरुण पाय घसरुन पाण्यात बुढाला. ग्रामस्थांनी तीन विद्युत मोटारी लावून तीन तास पाण्याचा उपसा केला आणि मृतदेह बाहेर निघाला.
परशुराम उर्फ प्रशांत नारायण पात्रे (वय २७) या असे पाण्यात बुढून मरण पावलेल्या शेत मजुराचे नाव असून ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता खैराट (ता.अक्कलकोट) येथे ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
हा तरुण एका शेतक-याकडे गवताला औषध फवारणीसाठी गेला होता. त्यासाठी पाणी लागणार होते. हे पाणी आणायला जवळच्या विहिरीत उतरला. मात्र अचानकपणे पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुढाला.
याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, नामदेव माने, बिरुदेव वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्रीच्या वेळी शवविच्छेदनासाठी मृतदेह अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, बहीण असा परिवार आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी राम पात्रे, श्रीकांत गायकवाड, कल्याणी गायकवाड, सायबणा गायकवाड, अमोल गायकवाड, पोलीस पाटील राजकुमार सोनकांबळे, शिवशरण गायकवाड, मलेशा तोळणूरे या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पोलिसांनी आणलेल्या आकड्याला लागला गळाला...
ही विहीर पाण्याने तुडूंब भरलेली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून ३ एचपी, ७ एच पी, ५ एच पीच्या तीन विद्युत मोटारी लावून पाण्याचा उपसा केला. सात तास मोटारी चालल्या तेंव्हा कुठे दहा फूट पाणी कमी झाले. त्यानंतर वागदरी दुरक्षेत्राच्या पोलिसांनी येताना लोखंडी आकडा आणला. त्याच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह निदर्शनास येताच मल्लेशा तोळणूरे यांनी आरडाओरडा केला.