युवा शेतकरी अनोखी शक्कल; मोबाईलच्या मदतीनं जनावरांसाठी बनवलं वातानुकूलित घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 10:57 AM2022-05-19T10:57:46+5:302022-05-19T10:58:56+5:30

पंखे अन् फॉगरच्या मदतीने जनावरांचा गोठा बनविला थंडा थंडा कुल कुल

Young farmers unique shackles; An air-conditioned house built for animals with the help of mobiles | युवा शेतकरी अनोखी शक्कल; मोबाईलच्या मदतीनं जनावरांसाठी बनवलं वातानुकूलित घर

युवा शेतकरी अनोखी शक्कल; मोबाईलच्या मदतीनं जनावरांसाठी बनवलं वातानुकूलित घर

Next

सोलापूर : एकीकडे तरुण मुले, लहान मुले मोबाइलमुळे बिघडली असे आपण म्हणतोय ... ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना नको ते पाहण्याचे व्यसनदेखील लागले असे सर्रास बोलतो, मात्र काही मुले अपवाद असतात. याच मोबाइलचा वापर करून मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील १६ वर्षीय मुलाने शेतात अनोखा प्रयोग केला आहे. आपल्या वडिलांना मदत म्हणून वातानुकूलित पंखे अन् फॉगरच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करीत जनावरांचा गोठा थंडा थंडा कुल कुल केला आहे.

मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शिवाजी साळुंखे हे पशुपालन व्यवसायाकडे वळले. त्यांचे बंधू शहाजी देशमुख हेदेखील शेती करतात. शिवाजी साळुंखे यांनी आपल्या बंधूंच्या शेतामध्ये मुक्त गोठा हा प्रकल्प सुरू केला आणि यामध्ये जर्सी जनावरांचे पालन सुरू केले. त्यांचा मुलगा शुभम त्यांना कामात मदत करू लागला. वाढत्या तापमानामुळे जनावरे आजारी पडून त्यांना ताप येऊ लागला. परिणामी दूधदेखील कमी येऊ लागले. या समस्येवर काही करता येईल का, असा विचार करीत मोबाइलमध्ये यूट्युबच्या माध्यमातून जनावरांची निगा कशी राखावी याविषयीची माहिती पाहत असताना त्याला एका ठिकाणी याविषयी माहिती मिळाली अन् गोठ्यामध्ये शेतात उपलब्ध असलेल्या ड्रीपची पाइप, बॅटरीवर चालणारा पंप घरातच उपलब्ध असणारे पंखे व पाच फॉगर ऑनलाइन मागवले आणि हा प्रयोग यशस्वी केला.

------------

असा राबविला प्रोजेक्ट..

बॅटरी पंपामध्ये साधारण वीस लीटर पाणी बसते आणि याच वीस लीटर बॅटरी पंपाच्या साह्याने त्यामध्ये पाणी ओतून त्याने हे फॉगर चालू केले. विजेवरती तीन पंखे सुरू केल्यानंतर हा बॅटरी पंप चालू केला की, त्यातील पाणी या ड्रीपच्या पाइपमधून सर्वत्र जाते आणि तुषार सिंचनाप्रमाणे यामधील पाणी, त्याचे तुषार कण उडू लागतात आणि यामुळे पूर्ण गोठ्यामध्ये थंड वाऱ्याची झुळूक निर्माण होते. जनावरांच्या पाठीवर थंड तुषार पडतो. गोठा अगदी गारेगार होऊन ते जनावरांचे थंडा घरच तयार होते.

-----------

फक्त २ हजारांचा आला खर्च

हा थंडगार गोठा तयार करण्यासाठी फक्त २ हजार रुपये खर्च आला असल्याचे शुभमने सांगितले. साळुंखे यांच्याकडे सध्या पंधरा जर्सी गाई असून या गाईंपासून ११० ते १२० लीटर दूध दररोज संकलन होते. लहान वयातच शेतीपूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------

वडील व काका मनापासून शेतीत कष्ट करीत आहेत. त्यांच्या कामात आपणही नेहमी काहीतरी हातभार लावावा असे सतत वाटायचे, त्यातून ही कल्पना सुचली आणि त्याला घरीदेखील सर्वांनी प्रतिसाद दिला याचा आनंद आहे.

- शुभम साळुंखे,शेतकरी, मोहाेळ

 

Web Title: Young farmers unique shackles; An air-conditioned house built for animals with the help of mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.