युवा भारत २०२० प्रेरणादायी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:52 AM2020-02-06T10:52:06+5:302020-02-06T10:52:15+5:30

‘ भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ या आपल्या प्रतिज्ञेला आपण ...

Young India दायी Inspirational ...! | युवा भारत २०२० प्रेरणादायी...!

युवा भारत २०२० प्रेरणादायी...!

Next

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ या आपल्या प्रतिज्ञेला आपण सारेच कटिबद्ध आहोत. ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या समाजात आपण राहतो त्या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीवर आपले प्रेम असायला हवे, त्याच्याबद्दल आदर असायला हवा. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होऊन सबंध जगामध्ये आपल्या देशाचे नाव एका वेगळ्या विधायक उंचीवर पोहोचणे, हे प्रत्येक देशवासीयाचे ध्येय असायला हवे. 

आपल्या देशाला थोर विचारवंतांचे वरदान लाभलेले आहे. या थोर मंडळींनी कितीतरी वर्षांपूर्वी आपल्या देशाच्या सर्वांगीण अशा विकासासंदर्भात, देशातील समाजव्यवस्थेबद्दल खूप काही विधायक संकल्पना मांडलेल्या होत्या आणि त्या दिशेने त्यांची वाटचालही होती. छत्रपती शिवरायांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करून एका आदर्श अशा ‘रयतेच्या राजा’ची भूमिका जगासमोर आणली. स्वामी विवेकानंदानी अमेरिकेतील शिकागो येथील धर्मपरिषदेमध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, आपल्या देशाचा इतिहास, परंपरा या गोष्टींचे भव्य दर्शन घडवून आणले. स्वामी विवेकानंदांचे युवकांच्या माध्यमातून निर्माण होणारे समर्थ भारत देशाचे स्वप्न होते. त्यांच्या मते समाजातला सामान्य माणूसच देशाचा कणा आहे आणि समाजाची एकरसता हेच आपल्या राष्टÑाचे बल! 

सध्याचे २०२० हे वर्ष अनेक अर्थाने खूपच प्रेरणादायी आहे. निसर्गाने आपल्या कृतिशीलतेला बहाल केलेल्या या वर्षामध्ये या थोर मंडळींच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याची हीच ती वेळ आहे. २००० साली गांधीवादी मिसाईलमॅन, माजी राष्टÑपती अब्दुल कलाम यांनी ‘विकसित भारत’ देशाचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५०० हून अधिक जणांची सांघिक शक्ती कार्यरत होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘व्हिजन २०२०’ हा प्रकल्प त्यांनी तयार केलेला होता. येणाºया २० वर्षांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा या प्रकल्पामध्ये होता. राष्ट्रपती बनण्यापूर्वी कलामांनी ‘इंडिया २०२० : ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक त्याच वेळेस लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसनशील देशाला विकसित भारत देशात रूपांतरित करून देशातल्या प्रत्येकाचे जीवन सुलभ, सुखी आणि समृद्ध करण्यासाठीच्या उपाययोजनांची नोंद आहे. 

‘याची देही याची डोळा...’ सन २०२० च्या आधुनिक वर्षामध्ये आपल्या सर्वांचे पदार्पण झालेले आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसºया दशकाकडे आपली वाटचाल सुरू आहे. देशाचा एक सर्वसामान्य पण जागरूक नागरिक या नात्याने राष्ट्रबांधणीच्या या महायज्ञामधे आपल्याला कृतिशीलतेच्या माध्यमातून ‘समिधा’ अर्पण करायच्या आहेत. आज देशामध्ये तरुणाईची प्रचंड मोठी संख्या आहे आणि ही तरुणाई सर्वसमावेशक अशा देशविकासासाठी देशाचे एक बलस्थान आहे. 

आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये इतरांसाठी वेगळे विधायक करण्याची प्रखर इच्छा जोपासणे आणि त्यातून सातत्याने कृती करत राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रउभारणीसाठी, राष्ट्रातल्या नागरिकांसाठी, आपण राहतो त्या ठिकाणच्या समाजासाठी जेवढे शक्य आहे तेवढे तन-मन-धनाने कार्यरत राहणे अपेक्षित आहे. देशातल्या अगदी शेवटच्या थरातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशविकास होय. त्यामुळे ‘विकसित’ देशाच्या निर्माणासाठी देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचणे गरजेचे आहे. 

आज अनेक व्यक्ती, संस्था, स्थानिक प्रशासन, शासन यासाठी कार्यरत आहे. आपणही आपल्या जबाबदारीच्या जाणिवेसह आपली सदसद्विवेकबुद्धी कायम जागृत ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून समाजाच्या हिताचा विचार सातत्याने करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही वेळ आहे. स्पर्धात्मक युगामध्ये स्वत:ला काळाच्या एक पाऊल पुढे ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशासाठी पूरक असणाºया गोष्टी निर्माण करण्याची  ताकद आजच्या युवक आणि युवतींच्या मनगटात आहे. देशातल्या लोकशाहीला आणि देशाच्या अखंडतेला अबाधित ठेवणे, देशावर शाश्वत प्रेम करणे, इतरांबद्दल बंधुभाव जोपासणे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, चांगल्या गोष्टींचे समर्थन आणि कौतुक करणे, भारतीय परंपरेची व जीवनमूल्यांची जपणूक करणे, पर्यावरणपूरकता जोपासणे या आणि अशा अनेक  विधायक गोष्टी आत्मसात करून एक आदर्श जीवन जगण्यासाठी आपण सारे कटिबद्ध राहूया...! 
- अरविंद म्हेत्रे
(लेखक पर्यावरण चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

Web Title: Young India दायी Inspirational ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.