प्रार्थनेची वेळ वाढविण्यावरून झालेल्या वादातून तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:09 AM2022-04-07T11:09:36+5:302022-04-07T11:10:09+5:30
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी फारुक हे ४ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मंगळवर पेठेतील प्रार्थनास्थळी समाजातील लोकांसमवेत आले होते.
बार्शी : प्रार्थनेसाठी वेळ वाढवून देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादविवादाचे पर्यवसान तरुणाला मारहाणीत झाले. या प्रकरणी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बार्शी शहरात मंगळवार पेठेत घडली. याबाबत जखमी फारुक रजाक सौदागर (वय २८ रा.मंगळवार पेठ) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वहाब इस्माईल सौदागर, रेहान सौदागर, मुस्तकीन सौदागर, फरहान सौदागर, सरफराज सौदागर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी फारुक हे ४ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मंगळवर पेठेतील प्रार्थनास्थळी समाजातील लोकांसमवेत आले होते. त्यावेळी वहाब सौदागर व आयाज सौदागर यांनी प्रार्थना स्थळाचे ट्रस्टी फरीद खलील सौदागर यास नमाज पठण करावयाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सर्वजण उपवास सोडून प्रार्थना करून घरी गेले. रात्री १० च्या सुमारास झालेली तक्रार मिटविण्यासाठी ट्रस्टीच्या घराकडे जात असताना आयाज हे रोडवर थांबले होते. भांडणे नको मिटवून टाकू म्हणत असतानाच फिर्यादीस गाठून आरोपींनी लाकडी काठीने, कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर जखमीस सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. आर. एस. धडके यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.