धक्कादायक; गुन्हा कबूल करण्यासाठी सोलापूर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 04:44 PM2022-04-22T16:44:54+5:302022-04-22T16:45:12+5:30
फौजदार चावडीच्या पोलीस निरीक्षकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : पोलीस कोठडीत गुन्ह्याचा तपास करत असताना आजारी असलेल्या भीमा काळेचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी, तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीमध्ये सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांनी गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील (सध्या नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे), सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे, पोलीस नाईक अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई आतिश काकासाहेब पाटील, पोलीस नाईक लक्ष्मण पोमू राठोड (सर्व नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, मयत आरोपी भीमा रज्जा काळे (वय ४२, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डूवाडी, ता. माढा) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी भीमा काळे याला कारागृहातून वर्ग करून ताब्यात घेतले होते. न्यायालयाकडून २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करून घेतली होती.
पोलीस कोठडीत असताना भीमा काळे याला सर्दी, ताप, खोकला व उलट्या होत होत्या. त्याच्या पायाला कशाचा तरी संसर्ग झाल्यामुळे सूज आली होती. भीमा काळे याला उपचारासाठी २४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.२५ वाजता मेडिकल यादीने सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. सात जणांविरुद्ध वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि कलम ३०४, ३३०, १६६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग भरारी पथकाचे डीवायएसपी जी. व्ही. दिघावकर करीत आहेत.
---
पोलीस कोठडीत झाली होती मारहाण
० भीमा काळे याने गुन्हा कबूल करावा, गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल काढून द्यावा म्हणून, तत्कालीन तपासी अधिकारी शीतलकुमार कोल्हाळ व अन्य पाच जणांनी पोलीस काेठडीत मारहाण केली होती.
० विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तपास अधिकारी शीतलकुमार कोल्हाळ यांना मार्गदर्शक सूचना दिल्याचे दिसून आले नाही.
० २२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता आरोपीला त्यांच्यासमोर हजर केले असता, तो लंगडत होता. दोन्ही पाय काळसर दिसत होते. तेव्हा त्याला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.
० पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावून छायाचित्रण जतन करण्याची जबाबदारी असताना, गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. असे मुद्दे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक श्रीशैल गजा यांनी फिर्याद दिली आहे.