‘त्या’ तरुणाने लाखाचे नुकसान करून दुचाकी पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:08+5:302021-06-17T04:16:08+5:30
बलवडी येथील सत्यजित लिगाडे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या सूरज पंडित याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत त्यांनी ...
बलवडी येथील सत्यजित लिगाडे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या सूरज पंडित याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत त्यांनी त्यास दोन-तीन वेळा समज दिल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता. याबाबत तो नवनाथ निंबाळकर याच्याजवळ, त्याला सुट्टी देणार नाही, असे बोलला होता. दरम्यान, १४ जूनरोजी सत्यजित लिगाडे सकाळी १० च्या सुमारास शेतात गेले असता, शेतातील ७ डाळिंबाची झाडे व १ नारळाचे झाड तोडलेले दिसले. तसेच १०० मीटर एसटीपी पाईपसह एसटीपी पंप तोडून पंपामध्ये माती टाकल्याचे दिसून आले.
याबाबत चौकशी केली असता, दादासोा निंबाळकर व नवनाथ निंबाळकर यांनी सांगितले की, सूरज पंडित याने १३ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास हा प्रकार केला आहे. ही घटना ताजी असताना १५ जूनरोजी सत्यजित लिगाडे सकाळी ७ च्या सुमारास अनकढाळ येथील पेट्रोल पंपावर गेले होते. सूरज पंडित याने सकाळी १०.३० च्या सुमारास सत्यजित लिगाडे यांची घरासमोर लावलेली (क्र. एमएच ४५ /एजे ३६०१ ही बुलेट दुचाकी सुतळीने पेटवून दिली. ही घटना समाधान शिंदे यांनी पाहून सत्यजित लिगाडे यांना फोन केला. त्यावेळी समाधान शिंदे ओरडल्यानंतर सूरज पंडित तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.