गणपती विसर्जनासाठी गेलेल्या लष्कर येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 10:31 PM2021-09-19T22:31:52+5:302021-09-19T22:32:22+5:30
समशापुर येथील घटना : रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापुर येथील नदीमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडला.
सागर अमरसिंग मदनावाले (वय २२ रा. लोधी गल्ली लष्कर सोलापूर) असे पाण्यात बुडलेल्या तरुणाचे नाव आहे. कोरोना या संसर्गजन्य आजार प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील तलाव व विहिरीच्या ठिकाणी गणपती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सागर मदनावाले हा आपल्या मित्रांसमवेत उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर येथे नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेला होता. नदीपात्रात गणपती मूर्तीचे विसर्जन करत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडाला, हा प्रकार त्याच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्यातील एकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पाण्यात बुडाला.
हा प्रकार समजताच आजूबाजूच्या लोकांनी पाण्यात उडी मारून त्याला शोधले. त्याची माहिती समजताच लष्कर परिसरातील नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कय्यावाले यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तत्काळ सोलापुरातील अग्निशामक दलाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही सागर कय्यावाले याचा शोध घेतला मात्र तरीही तो मिळून आला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत सागर मदनावाले याचा शोध सुरू होता.
या घटनेची माहिती समजल्यानंतर तहसीलदार, तलाठी व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली, सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.