ऑनलाईन शॉपिंगमधून कमिशन देण्याचे आमिष दाखवत तरूणाला अडीच लाखाला फसवले
By रूपेश हेळवे | Published: April 2, 2023 03:28 PM2023-04-02T15:28:40+5:302023-04-02T15:29:13+5:30
घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
रूपेश हेळवे, सोलापूर: ऑनलाईन शॉपिंगमधून जादा कमिशन देण्याचे अश्वासन देऊन तरुणाकडून २ लाख ५६ हजार ९१४ रुपये गुंतवण्यास सांगून ती रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश गोपाळ बुट्टा ( वय २५, रा. दीपाली नगर, एमआयडीसी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी योगेश यांच्या मोबईलवर कारिवाला इंडस्ट्रिज लिमिटेड या नावाने कंपनीचे संदेश आला. त्यात प्रत्येक दिवशी १६८८ रुपये ते ३० हजार रुपये घरी बसवून कमवू शकता असे लिहले होते. त्यावरील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना कारीवाला ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यावर ५ ते २० टक्के पर्यंत कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. सुरूवातीला २०० रुपयांची खरेदी केल्यानंतर फिर्यादींना २४७ रुपये मिळाले. त्यानंतर एक हजारांची ऑर्डर दिल्यावर ११४० रुपये मिळाले. त्यानंतर फिर्यादीला अडीच लाख रुपये गुंतवण्यास सांगितले.
यामुळे विश्वास ठेवून फिर्यादी योगेश यांनी अडीच लाख रूपये गुंतवले त्यानंतर त्याबाबतचे कमिशन विचारल्यानंतर तुम्ही टार्गेट पूर्ण केले नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगेश यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सोशल मीडियाचा लिंक वापरणारा इसम व कारिवाला इंडस्ट्रीज हे ॲप वापरत असलेल्या इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दराडे करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"