गणपतीसाठी पुण्याला निघालेल्या तरुणाचा रेल्वे डब्याच्या दरवाजातून खाली पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 11:55 AM2021-09-17T11:55:02+5:302021-09-17T11:56:17+5:30

जुनी मिल कंपाउंड परिसरातील घटना; आधार कार्ड, मोबाईलवरून पटली मृताची ओळख

A young man who was on his way to Pune for Ganpati fell down from the door of a train car and died | गणपतीसाठी पुण्याला निघालेल्या तरुणाचा रेल्वे डब्याच्या दरवाजातून खाली पडून मृत्यू

गणपतीसाठी पुण्याला निघालेल्या तरुणाचा रेल्वे डब्याच्या दरवाजातून खाली पडून मृत्यू

Next

सोलापूर : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या तरुणाचा रेल्वेच्या दरवाजातून तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.

कपिल अंबादास गुुंडाघा (वय ३५, रा. कामगार वसाहत, सुनीलनगर, एमआयडीसी, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशोत्सवाचा माहोल असल्याने मृत कपिल हा आपल्या पाच मित्रांसमवेत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी कोईमतूर एक्स्प्रेसने सोलापूरहून पुण्याला निघाला होता. साेलापुरातून निघालेली रेल्वे महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जुनी मिल कंपाउंड येथे आली असता बाथरूमला जातो असे मित्राला सांगून सीटवरून खाली उतरून रेल्वेच्या दरवाजात आला असता तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

---------

घटनास्थळाला पोलिसांनी दिली भेट...

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळावरून कपिलचा मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस नाईक क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

--------

मोहोळवरून मित्र आले परत...

मृत कपिलच्या खिशात लोहमार्ग पोलिसांना मोबाईल व ओळखपत्र आढळून आले. या मोबाईलवरून त्याच्या मित्रांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच देवदर्शनासाठी निघालेले कपिलचे पाच मित्र मोहोळ रेल्वेस्थानकावर उतरून सोलापूरला परतले.

 

दरवाजातून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हा अपघात आहे की घात याबाबतचा तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

- अमोल गवळी

पोलीस निरीक्षक, साेलापूर लाेहमार्ग पोलीस

Web Title: A young man who was on his way to Pune for Ganpati fell down from the door of a train car and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.