पोरगं हात उगारतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:52 PM2019-02-01T12:52:59+5:302019-02-01T12:53:26+5:30

सुखवस्तू घरात सुखाच्या वस्तू येत राहिल्या आणि सुख हरवत चाललंय. आपल्याला नेमकं काय हवं आहे? याचं उत्तर संपलंय का ...

Your hands are loaded! | पोरगं हात उगारतंय!

पोरगं हात उगारतंय!

Next

सुखवस्तू घरात सुखाच्या वस्तू येत राहिल्या आणि सुख हरवत चाललंय. आपल्याला नेमकं काय हवं आहे? याचं उत्तर संपलंय का कधी? हवं आहे. फक्त हवं आहे. प्रत्येक गोष्टीचा हव्यास आहे. याच नादात आपण हरवून जातो. खरं जगणं आणि वाट्याला येतं ते नको असलेलं कल्पनेच्याही पलीकडचं. मी असं का म्हणतोय? त्याचं कारण आहे. दररोज जगण्यात आणि दुनियादारीच्या गराड्यात माणसाच्या वाट्याला काय येईल ते सांगता येत नाही.

ही गोष्ट आहे घरात आलेल्या मोबाईलची. संपर्कासाठी महत्त्वाचंच साधन. अत्यंत गरजेचं. जगाजवळ क्षणात पोहोचता येतं. जग आपल्याजवळ क्षणात पोहोचतं, परंतु कोणत्या उपायानं असं करता येईल याच्या नादात मोबाईलवरचे शेकडो अ‍ॅप धुंडाळत धुंडाळत डोक्यामागचा व्याप तेवढा वाढत गेला. हे सगळं मी का लिहितोय? मोबाईलबद्दल. तर त्याची एक कथा आहे.

तर गोष्ट अशा सामान्य घरातली. बाप कुठंतरी पोटापुरतं भागेल असं काम करतोय. पोरगा नुकताच दहावी होऊन अकरावीला गेलाय. त्याच्या जगण्याच्या आणि वागण्याच्या कल्पना हवेतल्या झालेल्या आहेत. कारण त्याच्या भोवतीचं जग तसं आहे. त्यांच्या मित्रांचं आणि माणसांचं जग तसंच आहे. यातूनच मग त्याला या जगाविषयी, जगातल्या जगण्याच्या संकल्पनांविषयी विशेष अधिक माहिती झालेली असते. तो तसं जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करत असतो. मग होतं काय? तो हट्ट धरून बसतो. मला मोबाईल पाहिजे! दहा हजारांचा. थ्रीजी फोरजीचा. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसाठी. नेट आणि यु ट्यूबसाठी. गेली महिनाभर खरखर चालू होती.

आईजवळ पोरगा हक्कानं दटावून ओरडायचा. मी कॉलेजलाच जाणार नाही. बापासमोर बोलायचं धाडस होत नाही. पण रुसलेली अवस्था कळावी म्हणून आडदांडपणाचं वागणं काही टळत नव्हतं. आई समजावून सांगायची. उद्या घेऊ, परंतु याचा हट्ट काही संपत नव्हता. हुकूमशाहीप्रमाणे तो बेताल वागायचा. आपल्या पोटी जन्माला आलेल्या लेकराला कसं समजावून सांगायचं याची जाण आणि भान आईबापाजवळ नसते. कारण समोरची समस्याच तशी अडगळीतली आणि अडचणीतली. काय सांगावं? कसं सांगावं? कसं बोलावं? अशावेळी आईबापाला काहीच सुचत नाही. अशा वयातल्या पोराचं मन थाºयावर कसं आणणार.

मग पोरगं रोज जेवताना ताटावरून बोलता बोलता उठायचं. काम सांगितलं की अडवणूक करायचं. याच्याकडं एवढ्या रुपयाचा मोबाईल आहे. त्याच्याकडं एवढ्या किंमतीचा मोबाईल आहे. ऐकून ऐकून आईचे कान किटले. काय करावं आईबापानं अशावेळी? 
 एकेदिवशी घरातलं हे मोबाईलयुद्ध भलतंच पेटलं. बाप कामावर जायच्या घाईत. आई स्वयंपाकाच्या नादात. पोराचं गाणं सुरूच. मला आज मोबाईल पाहिजे. बाप म्हणाला, एवढा पगार नाही बाळा, एका दमात दहा पंधरा हजारांचा मोबाईल घ्यायला. ‘
पोरगं म्हणालं, ‘फायनान्सवाले द्यायला तयार आहेत. आपण फक्त  कागदपत्रं द्यायची.’

बाप चिडला. म्हणाला,‘कागदपत्रं द्यायची. पण पैसं काय फायनान्सवाल्याचा बाप भरणार हाय?’
पोरगं म्हणालं, ‘कुणाच्याबी बापाला भरावं लागू द्या. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. कधी घेताय सांगा? पैसं हफ्त्यानं भरायला येत्याल की?’

बाप म्हणाला, ‘हितं आयच्या मुतखड्यासाठी सतरा औषीधं करायला बचत गटाचं कर्ज काढून मेळ लावलाय. त्याचं हफ्तं फिटनात आणि त्यात तुज्या मोबाईचं खुळ कशाला काढतो बाबा..’
पोरगं हुशार, ते लगीच म्हणालं,‘त्या हफ्त्यात हे हफ्तं वाढलं तर बिघडलं कुठं? वाढू द्या की..’
बाप म्हणाला, ‘जमणार नाही. काय करायचं ते कर. कुठं जायाचाय तिकडं जा.’
बाप असं म्हणताच, पोरगं चिडलं. खरंतर बापच अधिक चिडला होता. पोटचं पोरगं ऐकत नाही, म्हणल्यावर काय करणार. रागानं तो म्हणाला, ‘ह्येला भाकरी खायच्या असतील तर खाऊ दे नाहीतर बोंबलत फिरू दे..’
बाप आपलं कसलंच चालू देत नाही म्हणल्यावर, पोरंग अधिक चिडून आणि ओरडून म्हणालं, ‘शेवटचं विचारतोय, मला मोबाईल घेणार हाय का नाही?’

बाप म्हणाला, ह्य न्हाय घेत. बस बोंबलत.
पोरगं अधिक चिडलं. अधिक चिडलं. चिडूनच बोललं...,‘कशाला असल्या दलिंदराच्या घरात जन्माला घातलं?..’ 
बापानं डोळं वटारलं. ते अधिक विस्फारलं. डोळ्यांतून आगच बाहेर पडत होती. बाप पोराच्या अंगावर धावून गेला. पोराच्या जवळ आला. तो हात उचलणार तेवढ्यात आवेशात येणाºया बापाकडं हात उगारून पोरगंच दोन पावलं पुढं गेलं. बापाच्या डोळ्यांतून आता आगीऐवजी अश्रू ओघळत होते..
-इंद्रजित घुले
(लेखक कवी अन् साहित्यिक आहेत)

Web Title: Your hands are loaded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.