आपला जीव प्यारा आहे ना, मग नियम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:27+5:302021-07-31T04:23:27+5:30
पंढरपूर : राज्यातील रूग्ण संख्या हळूहळू कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यातील ...
पंढरपूर : राज्यातील रूग्ण संख्या हळूहळू कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यातील रूग्णसंख्या समाधानकारकरित्या आटोक्यात आली नाही. चार दिवसांपासून कमी झालेली रूग्ण संख्या पुन्हा शंभराहून अधिक येत असल्याने धोका टळलेला नाही. आपला जीव प्यारा असेल तर कोरोनाचे नियम तंतोतंत पाळा अन्यथा तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल, असा सबुरीचा सल्ला प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रशासनाच्या वतीने जनतेला दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्याची सर्वाधिक आर्थिक व वैयक्तिक हानी झाली आहे. अनेक दिग्गजांना आपले प्राण गमवावे लागले. दुसरी लाट गेल्या महिनाभरापासून आटोक्यात येत होती. दररोज ५०० पेक्षा जास्त सापडणारी रूग्ण संख्या १०० च्या आत आली होती. मात्र चार दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात शंभरहून अधिक रूग्ण संख्या सापडत असल्याने प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे.
प्रशासनाकडून पुन्हा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव विषयी जनजागरण करण्यात येत आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर तालुक्यात १०० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने दिलेले नियम तंतोतंत पाळून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत अन्यथा पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य, महसूल, नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यांना सहकार्य करण्याची आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.
----
माझा व्यवसाय माझी जबाबदारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली कडक संचारबंदीत शिथिलता आणत सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सार्वजनिक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिल्यानंतर अनेक दुकाने मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे रूग्ण संख्याही वाढत आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी खबरदारी घेऊन ‘माझा व्यवसाय, माझी जबाबदारी’ या नियमाचे पालन करून ग्राहक व स्वत:ची काळजी घ्यावी. शिवाय कुटुंब प्रमुख या ना त्या कारणाने कायम बाहेर जातात. त्यांनीही आपल्यामुळे घरच्यांना त्रास होणार नाही, यासाठी स्वत: खबरदारी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार नाही, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
------
अनेक ठिकाणी कोरोना संपला असे गृहित धरून लोक विनामास्क, सोशल डिस्टन्स न ठेवता खुलेआम वावरत आहेत. ही चिंतेची बाब आहे. अजूनही कोरोना संपला नाही. दररोज रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, स्वत:हून तपासण्या करून घेणे, व्यायाम करणे आदी नियमांचे पालन करावे. तरच कोरोना आटोक्यात येईल.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर