बँकेचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:26 AM2021-08-19T04:26:54+5:302021-08-19T04:26:54+5:30
सांगोला येथील राहुल घाडगे याची ज्ञानेश्वर ऊर्फ बबलू ढोले यांनी लक्ष्मीदहिवडी येथील शिवराज महारुद्र स्वामी हे प्रोजेक्ट लोन करून ...
सांगोला येथील राहुल घाडगे याची ज्ञानेश्वर ऊर्फ बबलू ढोले यांनी लक्ष्मीदहिवडी येथील शिवराज महारुद्र स्वामी हे प्रोजेक्ट लोन करून देतात, अशी ओळख करून दिली. २०१९ मध्ये राहुल घाडगे यास व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्याने सांगोला सूतगिरणी समोरील पेट्रोल पंपावर शिवराज स्वामी यांची भेट घेऊन कर्जप्रकरण करून देता का, असे विचारले. त्यावेळी त्याने मी २५ लाखांचे प्रोजेक्ट लोन करून देतो, त्यापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २ लाख रुपये कमिशन द्यावे लागेल, असे म्हणाला.
त्यावर राहुल घाडगे याने मी तुम्हाला थोडे थोडे करून कमिशनचे पैसे देतो, माझे लोन मंजूर करून द्या, अशी विनंती केली. त्याने मिञ ॠत्विक खडतरे याच्या गुगल-पे ॲपवरून व स्वत: टप्प्याटप्प्याने सुमारे १ लाख ४४ हजार रुपये शिवराज स्वामी यांच्या लक्ष्मीदहिवडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यावर जमा केले. त्यानंतर कर्जप्रकरणाची फाईल मंजूर होण्यास तीन महिने लागतील, असे सांगून लवकरच कर्ज मंजूर करून घेतो, असे सांगितले.
राहुल घाडगे याने वेळोवेळी लोनसंदर्भात विचारले असता काहीतरी कारण सांगून थोड्या दिवसांत फाईल मंजूर होईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, लोन मंजूर होण्याबाबत शंका येऊ लागल्याने त्याने माझे लोन मंजूर करायचे राहू द्या, माझे घेतलेले पैसे परत द्या, असे म्हणाला. यावेळी आज देतो, उद्या देतो म्हणून प्रोजेक्ट लोन मंजूर न करता सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत राहुल घाडगे याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी शिवराज स्वामी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.