१५ फूट उंच जुना पुना नाका पुलावरुन तरुण कोसळला, दोघांवर रुग्णालात उपचार
By विलास जळकोटकर | Published: April 20, 2024 11:48 AM2024-04-20T11:48:49+5:302024-04-20T11:49:08+5:30
मोहन शिवाजी देवाळकर (वय- ३३), सुरज अशोक पांडे (वय- ३२, दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
सोलापूर : मुंबईहून हैद्राबादकडे वेगाने निघालेल्या रुग्वाहिकेचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्यानं ती डिव्हायडरला धडकून पलटी झाली. यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या काचा फुटून एक तरुण १५ फूट उंचावरुन कोसळला. अन्य एकजण जखमी झाला. जुना पुना नाका पुलावर शनिवारी सकाळी ८:४५ च्याव सुमारास हा धक्कादायक अपघात झाला. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहन शिवाजी देवाळकर (वय- ३३), सुरज अशोक पांडे (वय- ३२, दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
अधिक मिळालेली माहिती अशी की, एम. एच. ०३ सी व्ही ७८३६ या क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन वरील जखमी कोल्हापूरहून हैद्राबादकडे तेथून रुग्ण आणण्यासाठी निघाले होते. ही गाडी बाळे पार करुन जुना पुनानाका पुलावरुन पास होताना अचानक गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटला. यात रुग्णवाहिका डिव्हायडरला धडकून पलटी झाली.
रुग्णवाहिकेच्या समोरील काच फूटून आतील तरुण सुरज पांडे हा पुलावरुन जवळपास १५ फूट खाली कोसळला. यात त्याच्या दोन्ही हाताला मुका मार लागला. तर मोहन देवाळकर याच्या डोक्याला व हाता-पायास गंभीर जखम झाली. दोघांनाही तातडीने येथील शासकीय रुग्णायात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस तातडीने घटनास्थळी..
जुना पुना नाका पुलाजवळ अचानक मोठा आवाज आल्यानं एकच धांदल उडाली. आजूबाजूची मंडळी धावली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत फौजदार चावडीच्या पोलिसांनीही धाव घेऊन प्रथम जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
रुग्ण आणण्यासाठी निघाले होते हैद्राबादला
संबंधीत रुग्णवाहिका कोल्हापूरहून हैद्राबाद येथून एका रुग्णाला घेऊन येण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.