रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव
By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 7, 2022 05:53 PM2022-10-07T17:53:45+5:302022-10-07T17:54:32+5:30
रविवारपासून मंगळवेढ्यात सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव रंगणार आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण २९ कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे ७५ महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. बुधवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत.