आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून
By Appasaheb.patil | Published: April 21, 2019 08:59 AM2019-04-21T08:59:16+5:302019-04-21T09:09:39+5:30
बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील घटना; ओळख पटताच अवघ्या चार तासात संशयित आरोपींना वैराग पोलिसांनी जेरबंद केले.
सोलापूर : मुलीवर प्रेम करणाऱ्या प्रेमवीराला लग्न लावून देतो म्हणून गावाकडे बोलून घेऊन त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि .१८) बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली आहे. मृताची ओळख पटताच अवघ्या चार तासात संशयित आरोपींना वैराग पोलिसांनी जेरबंद केले.
याबाबतची वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अठरा तारखेला लोकसभा निवडणुकीची एकीकडे धावपळ चालू असताना भातंबरे येथील वनविभागाच्या जंगलात शांत डोक्याने एका तरुणाची हत्या करण्यात येत होती. दरम्यान वैराग पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवून शोध सुरू ठेवला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज योगेश राठोड ( रा.कात्रज, पुणे ) याचे कॉलेजमध्ये रेखा ( बदलेले नाव ) हिच्याशी प्रेम संबंध जुळले. तिचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील असल्याने या प्रकरणाची कुणकुण नातेवाईकांना लागताच त्यांनी तिला घेऊन आपले गाव गाठले. दरम्यान चौदा व पंधरा एप्रिलच्या रात्री सुरज आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गावाकडे आला होता. यावेळी त्यांचे भांडणही झाले. त्यानंतर सूरजला पुन्हा पुण्याला पाठवले.
आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे आपली नाचक्की होणार म्हणून मुलीच्या आईने, मावसभावाने व त्याच्या नातेवाईकाने त्या दोघांनाही ठार मारण्याचा कट रचला .मात्र आजीने नातीला एकटी न सोडल्याने तिचा जीव वाचला, पण सुरज चक्रव्यूहात अडकला. सुरजला तुझे लग्न लावून देतो असे आमिष दाखवून गावाकडे बोलवून घेतले. गावाजवळच्या एका धाब्यावर त्याला दारू पाजली. त्यानंतर भातंबरे येथील वनविभागाच्या जंगलात नेऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करून जागीच ठार मारले.
या घटनेनंतर बेवारस मृत्यूची नोंद वैराग पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. मृताची ओळख पटताच अवघ्या चार तासात पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे फिरवून संशयित आरोपी म्हणून अलका बाळासाहेब कांबळे व मोहन नामदेव सरवदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.