युवकांनी शंभूराजांचा आदर्श घ्यावा
By admin | Published: May 20, 2014 01:00 AM2014-05-20T01:00:53+5:302014-05-20T01:00:53+5:30
: गोसावी ‘मृत्युंजय संभाजी’ या विषयावर व्याख्यान, शिवगौरव पुरस्कारांचे वितरण
बार्शी : छत्रपती शंभूराजे हे ज्ञानी व महापराक्रमी राजे होते, परंतु त्यांचा खरा इतिहास जगासमोर कधीच आला नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी जगावे कसे हे शिकविले तर शंभूराजांनी स्वराज्या साठी कसे मरावे हे शिकविले. आयुष्यात जीवनाची खरी मूल्ये जाणून घ्यायची असतील तर युवकांनी या महापुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासावे व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मातापित्यांसाठी सर्वस्व जीवन अर्पित करावे, असे मत शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त येथील शिवराज्य सेनेच्यावतीने ‘मृत्युंजय संभाजी’ या विषयावर आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, रावसाहेब मनगिरे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण करंजकर, नगरसेवक दीपक राऊत, शिरीष जाधव, शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील, युवराज ढगे, प्रीतम मोरे, उमेश काळे, काका फुरडे, रामचंद्र इकारे, माजी नगराध्यक्ष पारखे कुर्डूवाडी, अॅड. राजश्री डमरे उपस्थित होते. यावेळी गोसावी यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वशैली व पहाडी आवाजाने शंभूराजेंचा धगधगता इतिहास सांगत रोमांच उभे केले व संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. छत्रपती शिवाजीराजे अन् छत्रपती धर्मवीर शंभूराजे या पितापुत्राच्या नात्यामध्ये युद्धकाळात विविध प्रसंगात उभे राहिलेले नाजूक हृदयस्पर्शी भावबंध हळुवारपणे उलगडून दाखविले. शंभूचरित्र उलगडत असताना त्यांनी सद्यपरिस्थितीशी संदर्भ जोडत चंगळवाद, भोगवादाकडे वळत असलेल्या तरुणाईला चांगल्या आदर्शांची पायवाट चोखाळण्याचा संदेश दिला तर पालकांना पाल्यांवर चांगले संस्कार करा, असे सांगत शिवराज्य सेनेतील तरुण शिवशभूंचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करीत आहेत अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा, असा सल्ला दिला.