राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळ; पर्यटन मंत्रालयाचा निर्णय
By Appasaheb.patil | Published: July 23, 2023 03:41 PM2023-07-23T15:41:50+5:302023-07-23T15:43:01+5:30
देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील प्रसिद्धी करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करावयाची आहे.
सोलापूर : पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून युवा पर्यटन मंडळे स्थापना करण्यात येत आहेत. देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील प्रसिद्धी करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करावयाची आहे. यातून विद्यार्थी व तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती तसेच शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीन जागृती निर्माण करण्यास सहाय्य होईल.
स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षांमध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी १० हजार व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार असे अनुदान 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा/महाविद्यालयांना देण्यात येईल.
राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना करणे व त्याअंतर्गत पर्यटन, प्रसिद्धी विविध उपक्रम राबविण्यासाठी 'युवा पर्यटन मंडळाची' स्थापना करणेबाबत पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय, पुणे यांनी आवाहन केले आहे.