तरुणाई रंगली शिवरुपात; शिवगंध, बाळी अन् दाढीसह तलवारकट मिशांचीही वाढली क्रेझ
By appasaheb.patil | Published: February 19, 2019 02:26 PM2019-02-19T14:26:08+5:302019-02-19T14:29:39+5:30
आप्पासाहेब पाटील । सोलापूर : मराठी मुलखात शिवराय म्हणजे प्रत्येकाचे जीव की प्राण. महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय अन् आदर्श. ...
आप्पासाहेब पाटील ।
सोलापूर : मराठी मुलखात शिवराय म्हणजे प्रत्येकाचे जीव की प्राण. महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय अन् आदर्श. नव्या पिढीतील तरूणाई तर हल्ली शिवमय झालेली आहे. शिवबाळी, शिवगंध लावून ही तरुणाई शिवरुपात दिसत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील असंख्य तरूणांनी मोठ्या अभिमानाने राजेंसारखी दाढी राखली असून, या दाढीचा तरूणाईला मोठा अभिमान आहे.
शहरात शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे़ शहर शिवमय झाले आहे़ सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार होत असताना आपण छत्रपतींसारखे दिसावे म्हणून आजची तरुणाई धडपडत आहे़ अनेक तरुण पिळदार मिशी राखत असून, मिशी तलवारीसारखी टोकदार व धारदार बनवत आहेत.
छत्रपतींसारखी रुबाबदार मिशी बनवून आपणही राजेंचे कणखर मावळे असल्याचे त्यांना वाटत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन मिशांवरून बोटे फिरवली तरी इतिहासाचे स्फुरण चढते. नुसत्या मिशाच नाही तर पूर्ण चेहरा छत्रपतींसारखा कसा दिसेल, याकडे तरुणाई लक्ष देत आहे. त्यासाठी दाढीचा आकारही राजेंसारखा बनविला जात आहे. एकेकाळी क्लीन शेव्हड राहणं पुरुषांसाठी फार महत्त्वाचं मानलं जात होतं.
गालावर वाढत असलेले दाढीचे छोटे खुंटही ताबडतोब हटवले जात होते, पण आज हे चित्र पूर्णत: बदलले आहे.
क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात़...
- सध्या दाढी वाढविणे व राखण्यासाठी बाजारात नवनव्या प्रकारच्या क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात आले आहेत़ त्यात प्रामुख्याने बेआर डू व वुस्त्रा या नावाच्या क्रिम चांगल्या गाजत आहेत़ या क्रिम्समुळे दाढीच्या केसांना शायनिंग, कडकपणा, रुबाबदारपणा याशिवाय सेफ देण्यासही याचा चांगला उपयोग होतो़ याशिवाय शेव्हिंग जेलही बाजारात सध्या जास्तीचा भाव खात आहे़ दरम्यान, घरच्या घरी दाढी करता यावी व सेफ देता यावा, यासाठी दहा ते बारा प्रकारचे कंगवे बाजारात आले आहेत़ तीन बोटांत, चार बोटांत बसण्याइतके थोडे व मोठे कंगवे आहेत़
आम्ही डॉक्टरी पेशात काम करीत असल्यामुळे दाढी ठेवणे चालत नाही़ मात्र शिवरायांचे विचार मनात आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी शिवदाढी ठेवली आहे़ मात्र परीक्षा व अन्य कारणांसाठी दाढी ठेवणे जमत नाही़ तरीही आम्ही दाढी ठेवणे पसंत करतो़ दाढी ठेवल्यामुळे चेहºयाला एक वेगळ्याच प्रकारचा लूक प्राप्त होतो़
-डॉ़ प्रतीककुमार शिंदे,
शासकीय रुग्णालय, सोलापूऱ
शिवजयंतीमुळे मागील तीन महिन्यांपासून युवकांमध्ये दाढी ठेवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे़ शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींच्या विचारांचा वारसासुद्धा तरुण पिढी पुढे चालवित आहे़ खास दाढी ठेवण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात आले आहेत़ युवकांमध्ये दाढी वाढविण्याची क्रेझ वाढत आहे़
- आकाश गोरे, हेअर स्टाईलिश