सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील खड्डे बुजवण्यासाठी युवक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:57 AM2021-10-01T10:57:56+5:302021-10-01T10:58:02+5:30
रस्त्यावरील खड्ड्यांत बसून अनोखे आंदोलन; महापालिका प्रशासनाचा केला निषेध
सोलापूर : सोलापूर शहराचे प्रवेशद्वार म्हणजेच पूनानाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पडलेले मोठमोठे खड्डे त्वरित बुजवण्याच्या मागणीसाठी सोलापुरातील युवक रस्त्यावर उतरले असून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास खड्ड्यांत बसून युवकांनी अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलनातून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा धिक्कार केला.
सोलापूर शहरात प्रवेशद्वार व शहरातील मुख्य चौकापर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर या खड्ड्यांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य दररोज पसरत आहे. त्याचा नाहक त्रास वाहनधारकांची सोबतच रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापाऱ्यांना होत असून आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.
सोलापूरच्या प्रवेशद्वारावर पडलेले खड्डे येत्या आठ दिवसांत उज्ज्वल यास मोठे आंदोलन उभा करण्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्या युवकांनी यावेळी दिला. या आंदोलनप्रसंगी संदीप दुगाणे, अक्षय माने, मनोज कलाल, हर्ष माने, संजय कोडगले, प्रशांत मशाळ, सुजित खकाळ, महेश गुंड, सुनील कवलदार, ऋषिकेश घुमटे आदी उपस्थित होते.
------------–--
...अन्यथा मोठे आंदोलन छेडणार
मागील महिन्यात पूनानाका परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी मी स्वतः महापालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या खड्ड्यांवर तात्पुरती डागडुजी करून खडी अंथरली. मात्र, पुन्हा पावसामुळे ही खडी बाजूला सरकून मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा वाहनधारकांना मोठा त्रास होत असून अनेक वाहनांचे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. येत्या आठ दिवसांत या मार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास यास सोलापूरचे प्रवेशद्वार बंद करून मोठे आंदोलन छेडू, असा इशारा संदीप दुगाने यांनी दिला.