कंदलगावात लोकसहभागातून युवकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:25 AM2021-09-26T04:25:22+5:302021-09-26T04:25:22+5:30
केली मर्दानी खेळाच्या मैदानाची उभारणी लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : विधायक कार्यक्रमांचा ध्यास घेत कंदलगाव येथील युवकांनी लोकसहभागातून मर्दानी ...
केली मर्दानी खेळाच्या मैदानाची उभारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : विधायक कार्यक्रमांचा ध्यास घेत कंदलगाव येथील युवकांनी लोकसहभागातून मर्दानी खेळाच्या मैदानाची निर्मिती केली आहे. निर्माण केलेले मैदान चिमुकल्यांना खुले केले तर युवकांसाठी अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करून दिली.
कंदलगाव येथे सहारा क्रीडा मंडळ स्थापन करण्यात आले आहे. गावातील युवकांना एकत्र करून त्यांच्यात खेळाची आवड निर्माण करणे, त्यातून शारीरिक तंदुरुस्ती साध्य करण्याचा मंडळाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता. सद्दाम शेख या युवकाने मैदानी खेळासाठी क्रीडांगण निर्माण करण्याचा ध्यास घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मोकळी जागा उपलब्ध होती. मात्र तिची दुरवस्था झाली होती. सद्दाम शेख याने शाळेच्या मुख्याध्यापकाशी चर्चा करून या जागेत सकाळी शाळकरी मुले आणि सायंकाळी गावातील युवकांना मैदानी खेळांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.
सहारा क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करीत लोकवर्गणीतून मैदानासाठी लाल माती, जेसीबी भाडे, आदी कामे केली. लाल मातीचे उत्खनन करण्याची तहसील कार्यालयाकडून मान्यता, त्यासाठी गौण खनिज विभागाकडे रॉयल्टी भरणे ही सगळी कामे युवकांनी परस्पर समन्वयाने मार्गी लावली. वाहतुकीसाठी काहींनी स्वतःची वाहने उपलब्ध करून दिली तर काहींनी श्रमदान केले. युवकांच्या अंगमेहनतीतून सुंदर क्रीडांगणाची निर्मिती शक्य झाली.
-----
विधायक कामांसाठी सहकार्य
सहारा क्रिकेट मंडळाने निर्माण केलेल्या या क्रीडांगणाचे उद्घाटन माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. विधायक उपक्रम राबवणाऱ्या युवकांना नेहमीच सहकार्य करण्याची माझी भूमिका राहील. कधीही माझ्याकडे या मदत नक्की मिळेल असे अभिवचन माने यांनी दिले.
------
युवकांना खेळाचे महत्त्व समजले आहे. कोरोनाच्या काळात करमणूक आणि खेळ या दोन्ही गोष्टींकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मैदाने ओस पडली होती. त्यांची डागडुजी केल्याने छोट्या-मोठ्यांना लाभ होईल. माझ्या सहकाऱ्यांनी चांगले योगदान दिले आहे.
- सद्दाम शेख
संस्थापक, सहारा क्रीडा मंडळ, कंदलगाव