‘झेडपी’च्या तिजोरीत २४७ कोटी शिल्लक
By admin | Published: July 16, 2014 12:49 AM2014-07-16T00:49:58+5:302014-07-16T00:49:58+5:30
ढिम्म कारभार : एप्रिलपासून तीन महिन्यांत केवळ ११ टक्के खर्च
सोलापूर: एकीकडे निधी नाही म्हणून बोंब तर दुसरीकडे निधी असताना तो खर्चला जात नाही, फायलींवर निर्णय लवकर होत नाही म्हणून बोंब़ अशा अवस्थेत झेडपीचा गाडा अडकल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या १२ विभागांमध्ये गतवर्षीचा आणि चालू वर्षाचा असा एकत्रित २४७ कोटी ३९ लाख ४३ हजार ६९७ रुपयांचा निधी शिल्लक असल्याची बाब पुढे आली आहे़
जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची मासिक बैठक सोमवारी पार पडली़ या समितीसमोर मुख्य लेखा व वित्त विभागाकडून (कॅफो) ही आकडेवारी देण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेत आम्हाला जमा- खर्चाचा तपशील दिला जात नसल्याची ओरड काही सदस्य करतात, मात्र याकडे मोजकेच सदस्य बारकाईने लक्ष देऊन आपल्या भागात निधी पळवितात़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पद रिक्त आणि त्यातच पदाधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय याचा परिणाम जिल्ह्यातील विकास कामांवर होत आहे़ ‘रामभरोसे’ कारभार चालल्यामुळे ‘दादागिरी’ केल्याशिवाय झेडपीचे अधिकारी पळत नाहीत, असे चित्र आहे़
जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न (सेस) सध्या ३४ कोटींवर पोहोचले आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून तसेच शासनाकडून त्या त्या विभागाला थेट अनुदान दिले जाते, त्यामुळे बालाजीच्या हुंडीमध्ये जसा निधी शिल्लक असतो तशी अवस्था झेडपीत दिसत आहे़ सन २०१३-१४ वर्षाचा २१० कोटी ५९ लाखांचा निधी शिल्लक आहे़ हा सोडून यंदाच्या वर्षी ११३ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला खरा परंतु प्रत्यक्षात ३६ कोटी ८० लाख प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे गतवर्षीचा शिल्लक निधी आणि यंदा प्राप्त झालेला निधी विचारात घेता तिजोरीत सध्या २४७ कोटी शिल्लक आहेत़ विशेष म्हणजे अद्याप जिल्हा नियोजन समितीकडून एक रुपया देखील निधी मिळाला नाही तरी एवढा निधी शिल्लक आहे़ नियोजन समितीमधून १११ कोटी मिळणार आहेत़ त्यामुळे करोडो रुपयांचा निधी असताना खर्चाची आकडेवारी मात्र नगण्य असल्याचे दिसते़
---------------------------
विविध विभागांचा शिल्लक निधी
जिल्हा प्रशासन (ग्रामपंचायत)- ४१़२५ कोटी
शिक्षण विभाग (प्राथमिक) - ३०़८६ कोटी
शिक्षण विभाग (माध्यमिक) - ५़४७ लाख
बांधकाम विभाग - ३७़ ८६ कोटी
लघुपाटबंधारे विभाग- २१़१८ कोटी
आरोग्य विभाग-१३़३५ कोटी
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग-१७़२६ कोटी
शेती विभाग-८़४० कोटी
पशुसंवर्धन विभाग-१०़३९ कोटी
समाजकल्याण व अपंग कल्याण विभाग-४७़२६ कोटी
महिला व बालकल्याण विभाग-१४़६७ कोटी
एकूण शिल्लक निधी - २४७ कोटी ३९ लाख ४३ हजार ६९७
---------------------------------
योजनानिहाय शिल्लक निधी
जिल्हा वार्षिक योजना (हस्तांतरण)-८५़७३ कोटी
जिल्हा वार्षिक योजना (अभिसरण)-११़९५ कोटी
शासन योजना (हस्तांतरण)-९६़९९ कोटी
शासन योजना (अभिसरण)-१८़०५ कोटी
जिल्हा परिषद (सेस)-३४़६५ कोटी
एप्रिल ते जून खर्च- २६़८७ कोटी
-----------------------
जिल्हा परिषदेच्या तिजोरीत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामधील २१० कोटी ५८ लाख शिल्लक आहेत़ सन २०१४-१५ साठी ११३ कोटी मंजूर झाले असून, प्रत्यक्षात ३६ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे सध्या जि़प़च्या विविध योजनांसाठी तरतूद असलेला २४७ कोटींचा निधी जि़प़च्या तिजोरीत आहे़
- गौतम जगदाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि़प़ सोलापूर