जिल्हा परिषद शिक्षकांनो, शिकवताना मोबाईल ठेवा बंदच ठेवा; झेडपी सीईंओंच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 04:05 PM2022-06-28T16:05:17+5:302022-06-28T16:05:44+5:30
सीईओंच्या सूचना : गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री
सोलापूर : शाळेत जर शिकविताना मोबाईलची गरज नसेल तर मोबाईल बंद ठेवा. विद्यार्थ्यांना मोबाईलची सवय लागल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. याची जाणीव पालकांना करून द्यावी. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाहीत याची काळजी घेण्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, अधिव्याख्याता इमानदार प्रमुख उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ कामाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम बनविणे, आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कोरोनाचे काळात शिक्षकांनी घरी बसूनदेखील ऑनलाईन शिक्षण, पारावरची शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षकांपासून दूर गेले. त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात झालेली हानी आपणास भरून काढण्यासाठी दशसूत्री देण्यात आली.
------
शिक्षण विभागासाठी दशसूत्री
गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे, आनंददायी व नावीन्यपूर्ण शिक्षण, आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण, तंत्रस्नेही/ आयटीक्षम शिक्षण, सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन, स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन/ लेखक/ कवी निर्मिती, कौशल्य चिकित्सक विचार, सृजनशिलता सहयोग, ज्ञानातील आधुनिकता ग्रहण करण्यासाठी, शिक्षकांनी प्रयत्न करणे, स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती, मातृपितृ भक्ती वाढविणे, गुरुकुल पद्धतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती ही दशसूत्री देण्यात आली आहे.