कलेक्टरच्या तंबीनंतर झेडपी प्रशासन नरमले; एकाच दिवसात दिली कृषी विभागाला माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:39 PM2020-09-08T17:39:48+5:302020-09-08T17:42:26+5:30
'लोकमत'च्या बातमीचा परिणाम; पंतप्रधान पुरस्कार प्रवेशिकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला केले होते असहकार्य
सोलापूर: 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तंबी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन नरमले आहे. एकाच दिवसात जलसंधारण कामाची माहिती कृषी विभागाकडे सादर करण्यात आली आहे.
काम करायचे आम्ही आणि पुरस्कार घ्यायचा तुम्ही असा काहीसा सवतीमत्सर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी दाखविल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. लोकसहभागातून जलयुक्त शिवारासाठी सोलापूर जिल्ह्याचे नाव प्रधानमंत्री नाविण्यपूर्ण पुरस्काराच्या सादरीकरणासाठी आले आहे. याचे कौतुक होत असतानाच गावांमध्ये झालेल्या जलसंधारण कामाची जिल्हा परिषदेकडून माहिती घेण्यासाठी माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी संपर्क साधला.
वायचळ यांनी तातडीने स्वच्छता व पाणी पुरवठ्याच्या अधिकाºयांना माहिती देण्याचे आदेश दिले होते. पण येथील संबंधीत अधिकाºयांनी केवळ सहा गावांची यादी दिली होती. अर्धवट माहितीमुळे कृषी विभागाची पंचायत झाली. जिल्हा परिषदेने दाखविलेल्या या सापत्नभावाच्या वागणुकीबाबत कृषी विभागाने नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व पाणीपुरवठा प्रशासनाकडून असहकार्य झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी वायचळ यांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक असलेली जलसंधारणाची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून एका दिवसात माहिती मिळाल्याचे कृषि विभागाचे उपसंचालक रविंद्र माने यांनी सांगितले.