झेडपी निवडणूक तयारी : मोहिते-पाटील, तोडकर यांच्यासह चार जणांच्या मतदारसंघावर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 12:53 PM2021-06-09T12:53:15+5:302021-06-09T12:53:21+5:30
अकलूज, म्हाळुंग, नातेपुते, वैराग नगरपंचायतीचा परिणाम
सोलापूर : जिल्ह्यात नव्याने होत असलेल्या चार नगरपंचायतींमुळे शीतलदेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, साक्षी सोरटे व निरंजन भूमकर या चार जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघावर गंडांतर येण्याची शक्यता असल्याचे झेडपीच्या वर्तुळात बोलले जात आहे.
मार्च २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती मागविली आहे. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी ग्रामीण भागाच्या लोकसंख्येची माहिती सादर करण्याबाबत सूचित केले आहे. जिल्हा परिषदेची २० मार्च, तर पंचायत समित्यांची १३ मार्च २०२२ रोजी मुदत संपणार आहे. ही मुदत संपण्याआधीच सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी त्यांची सदस्य संख्या निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्याच्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची माहिती सादर करण्याची तयारी सुरू झाली आहे. या लोकसंख्येमधून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, नगरपंचायती तसेच महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे अकलुज, म्हाळुंग, नातेपुते, वैराग या नगरपंचायती झाल्याने या ग्रामपंचायतींची लोकसंख्या आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुनर्रचित मतदारसंघात झेडपीचे हे मतदारसंघ असणार नाहीत, असे सांगितले जात आहे.
सन २०१६ च्या निवडणुकीत अकलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून शीतलदेवी मोहिते-पाटील, म्हाळुंगमधून अरुण तोडकर, नातेपुतेतून साक्षी सोरटे व वैरागमधून निरंजन भूमकर हे निवडून आले आहेत. हे मतदारसंघ रद्द झाल्यास या सदस्यांना पुढील निवडणूक लढविण्यासाठी नवीन मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. म्हाळुंग गटातील वाफेगाव, पिलीव, लवंग, वाघोली आदी सहा गावे आता कोणत्या मतदारसंघाला जोडली जाणार, हेही पाहावे लागणार आहे. म्हाळुंग नगरपंचायत झाल्याने झेडपीचा मतदारसंघ गेला. त्यामुळे आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, असे तोडकर यांनी सांगितले.
कुर्डू राहिले रिक्तच
जिल्हा परिषदेचे सद्य:स्थितीत ६८, तर पंचायत समितीचे १३६ मतदारसंघ आहेत. नव्या पुनर्रचनेत चार मतदारसंघांचे काय करणार व हे मतदारसंघ रद्द झाल्यास पंचायत समितीचे ८ सदस्य कमी होणार आहेत. विशेष म्हणजे झेडपी सदस्य संजयमामा शिंदे विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांचा मतदारसंघ रिक्त झाला; पण कोरोना महामारीमुळे कुर्डूची पोटनिवडणूक झालीच नाही.