झेडपीचे गुरुजी सरसावले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:59+5:302021-05-12T04:22:59+5:30
तालुक्यातील जि. प. शिक्षक सध्या कोविड सर्वेक्षणकामी कार्यरत असतानाच कोविड रुग्णावर उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत म्हणून प्रत्येक ...
तालुक्यातील जि. प. शिक्षक सध्या कोविड सर्वेक्षणकामी कार्यरत असतानाच कोविड रुग्णावर उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत म्हणून प्रत्येक जि. प. शिक्षक स्वतःहून आपली वर्गणी गोळा करीत असून, लवकरच ८ ते १० लाख रुपये गोळा करून तालुक्यात नव्यानेच माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने यांच्या पुढाकारातून नागनाथ विद्यालयाच्या मागे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला देणार असल्याचे मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, तर सध्या जवळपास ५०० शिक्षकांच्या माध्यमातून ५ लाख रु. मदत निधी संकलित झाला असून, याकामी काही सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख व अत्यल्प वेतन असणाऱ्या शिक्षकांनीसुद्धा सहभाग दिला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सध्या रुग्णांना ऑक्सिजनची खूप गरज आहे आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. पेशंटला ऑक्सिजन बेड मिळणे खूप कठीण झाले आहे. यासाठी स्वेच्छेने मदतनिधी संकलन करूया, असा संकल्प करण्यात आला. जमा झालेल्या मदत निधीमधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व इतर आवश्यक मेडिकल साहित्य कोविड सेंटरला भेट देण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
----
‘माजी आ. राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून ८ ते १० लाख रु. मदत निधी देण्याचा आमचा संकल्प असून, यासाठी केंद्रनिहाय शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी नेमून निधी संकलन करीत आहोत, लवकरच हा निधी सुपूर्द करून कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
-मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती
---