‘टेटे’मध्ये भारताने केला क्लीन स्वीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:52 AM2018-04-10T03:52:59+5:302018-04-10T12:10:57+5:30
भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला.
गोल्ड कोस्ट : भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला.
भारतीय महिला संघाने रविवारी सिंगापूरचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते. पुरुष संघाने आज उपांत्य फेरीत सिंगापूरविरुद्ध चुरशीच्या लढतीत ३-२ ने बाजी मारली. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आल्यानंतर प्रथमच भारताच्या महिला व पुरुष संघांनी सांघिक प्र्रकारात सुवर्णपदकाचा मान मिळवला. टेबल टेनिसमध्ये वैयक्तिक व दुहेरीच्या लढती अद्याप शिल्लक आहेत. अशास्थितीत सांघिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भारतीय खेळाडूंनी अधिक पदके जिंकण्याची आशा कायम राखली आहे.
ग्लास्गो २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला केवळ पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळाले होते. ग्लास्गोमध्ये पुरुष सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत नायजेरियाने भारताचा पराभव केला होता. या स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीमुळे देशात टेबल टेनिसचा स्तर उंचावला असल्याचे सिद्ध होते. अव्वल १०० मानांकित खेळाडूंमध्ये भारताच्या सहा पुरुष व दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे.
जागतिक क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेला अजंत शरत कमल देशाचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू आहे, यात शंका नाही. तो २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या संघाचा सदस्य होता. आता राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर चार सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.
अंतिम फेरीत पहिल्या लढतीत कमलने नायजेरियाच्या बोडे अबिओदूनविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर ३-१ ने लढत जिंकली. त्याने ४-११, ११-५, ११-४, ११-९ ने विजय मिळवला. युवा साथियान गनासेकरनने पहिला सेट गमावल्यानंतर सेगुन तोरेओलाला ३-१ १०-१२, ११-३, ११-३, ११-४ असे नमविले. त्यानंतर साथियान व हरमित देसाई या भारतीय जोडीने अबिओदून व ओलजिदे ओमोतायो जोडीचा ११-८, ११-५, ११-३ ने पराभव करीत सुवर्णपदक पक्के केले. (वृत्तसंस्था)
भारतीय संघासाठी अंतिम लढत एकतर्फी
ठरली असली तरी उपांत्य फेरीत मात्र सिंगापूरविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली.
अनुभवी गाओ निंगने सिंगापूरसाठी एकेरीमध्ये विक्रमी दोन विजय मिळवले.
निंगने देसाई व साथियान यांचा ३-० व ३-१ ने पराभव केला. कमलने एकेरीत शू जिये पांग व शाओ फेंग एथान पोह यांचा ३-० ने पराभव केला. दुहेरीत साथियान व देसाई यांनी पांग-पोह यांचा
३-१ ने पराभव करीत भारताला अंतिम फेरीत नेले.