हंगेरी ओपन टेबल टेनिस स्पर्धेत शरथ-साथियान यांना रौप्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:33 AM2020-02-24T01:33:19+5:302020-02-24T01:33:34+5:30
बेनेडिक्ट हुडा आणि पॅट्रिक फ्रांजिस्का या जर्मनीच्या जोडीकडून पराभव
बुडापेस्ट : अचंता शरथ कमल आणि जी. साथियान या भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला आयटीएफ विश्व टूर हंगेरी ओपन टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत बेनेडिक्ट हुडा आणि पॅट्रिक फ्रांजिस्का या जर्मनीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
शनिवारी झालेल्या लढतीत भारतीय जोडीने कडवे आव्हान उभे केले, मात्र तरीही त्यांना १६ व्या मानांकित जोडीकडून ३० मिनिटांमध्ये ५-११, ९-११, ११-८, ९-११ असा पराभव स्वीकारावा लागला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कमल याचे हे दुसरे पदक आहे. या आधी त्याने मनिका बात्रा हिच्यासोबत मिश्र दुहेरीत कांस्य पदक पटकावले होते.
त्यासोबतच स्वीडनच्या ओरेब्रोमध्ये स्विडीश ज्युनियर आणि कॅडेट ओपनमध्ये चेन्नईच्या मथान राजन हंसिनीने मिनी कॅडेट मुलींच्या एकेरीत कांस्य पदकाची कमाई केली होती. दहा वर्षांच्या हंसिनीला उपांत्य फेरीत रशियाच्या लुलिया पुगोवकिनाकडून १२-१०, ९-११, ५-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला. कॅडेट मुलींच्या गटात सुहाना सैनी आणि कॅडेट मुलांच्या गटात एकेरीत सुरेश राय प्रयेश याने उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये जागा मिळवली आहे.