महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 1 डिसेंबरपासून 'या' 4 गोष्टी महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:10 PM2021-11-29T22:10:56+5:302021-11-29T22:21:46+5:30
1 December Rule : 1 डिसेंबरपासून Jio रिचार्जसह एकूण 4 सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार आहे.
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. काही सुविधांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. इंटरनेट युजर्ससाठी डिसेंबरची सुरुवात विशेष चांगली नसणार आहे. 1 डिसेंबरपासून Jio रिचार्जसह एकूण 4 सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार आहे. या सर्व ऑनलाईन सेवांच्या किमतीत सुमारे 20 ते 50 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामध्ये जिओ रिचार्ज, Amazon प्राइम मेंबरशिप, डीटीएच रिचार्ज आणि एसबीआय क्रेडिट कार्डसारख्या सुविधांचा समावेश आहे.
Jio रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचे नवीन टॅरिफ प्लॅन 1 डिसेंबर 2021 पासून देशभरात लागू केले जात आहेत. त्यात 20 टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत JioPhone च्या 75 रुपयांच्या प्लॅनऐवजी 91 रुपये द्यावे लागतील. तर 129 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन 155 रुपयांमध्ये मिळेल. Jio ने आपल्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तीत जास्त 480 रुपयांची वाढ केली आहे. जिओच्या 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 2399 रुपयांऐवजी 2879 रुपये असेल.
Amazon Prime रिचार्ज
Amazon प्राइम मेंबरशिप प्लॅनचे नवीन दर 14 डिसेंबरपासून देशभरात लागू होतील. Amazon प्राइम सबस्क्रिप्शन 50 टक्क्यांनी वाढले आहे, ज्यामुळे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन 1499 रुपयांपर्यंत वाढेल, जो सध्या 999 रुपयांवर येतो. त्याच तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी 329 रुपयांऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर मासिक प्लॅन 129 रुपयांऐवजी 179 रुपयांचा असेल. Amazon Prime सदस्यत्वाच्या वाढलेल्या किमतींचा Amazon Prime सदस्यत्व योजनेसाठी ऑटो-नूतनीकरण पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर होणार नाही.
DTH रिचार्ज
1 डिसेंबरपासून देशातील निवडक वाहिन्यांच्या किमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत युजर्सना हे चॅनेल पाहण्यासाठी 50 टक्के जास्त किंमत मोजावी लागेल. स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना 35 ते 50 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. सध्या या वाहिन्यांची सरासरी किंमत 49 रुपये प्रति महिना असून ती दरमहा 69 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. सोनी चॅनल पाहण्यासाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये प्रति महिना मोजावे लागतील. त्याचप्रमाणे ZEE वाहिनीसाठी 39 रुपयांऐवजी 1 डिसेंबरपासून दरमहा 49 रुपये आकारले जातील. तर Viacom18 चॅनेलसाठी, तुम्हाला 25 रुपयांऐवजी 39 रुपये प्रति महिना द्यावे लागतील.
SBI क्रेडिट कार्ड
SBI च्या क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका बसणार आहे. 1 डिसेंबरपासून, SBI क्रेडिट कार्डसह खरेदी महाग होईल. कारण, प्रत्येक खरेदीवर 99 रुपये आणि कर स्वतंत्रपणे भरावा लागेल. हा प्रोसेसिंग चार्ज असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.