11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:25 IST2022-11-10T06:25:14+5:302022-11-10T06:25:22+5:30
फेसबुकची पालक कंपनी मेटातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे

11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी
वाॅशिंग्टन :
फेसबुकची पालक कंपनी मेटातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे, हे कळविण्यासाठी केलेल्या ई-मेलमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग कर्मचाऱ्यांना ‘सॉरी’ म्हणाले.
कंपनीचे नुकसान, जाहिरातींचा कमी झालेला महसूल या संकटातून कंपनीला वाचविण्यासाठी झुकेरबर्ग यांनी नोकरकपातीचा मार्ग स्वीकारला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी नोकरकपात केली. त्याचा तडाखा ट्विटरमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीयांनाही बसला आहे.
सर्वात मोठी नोकरकपात
- मेटा कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी नोकरकपात केली आहे.
- ट्विटर, मायक्रोसॉफ्टनेही काही दिवसांपूर्वी नोकरकपात केली होती. आता सोशल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्रातील आणखी कोणती कंपनी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारवाई सर्व उपकंपन्यांमध्ये
मेटाच्या मालकीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आदी उपकंपन्या आहेत. कोणत्या उपकंपनीतील किती कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात येणार आहे, त्यात किती भारतीय आहेत, याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
मेटाने नाइलाजाने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणतो. मेटाने आजवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीला नुकसान सोसावे लागले. त्या गोष्टीला मी उत्तरदायी आहे.
- मार्क झुकेरबर्ग