‘५जी’साठी दीड लाख कोटींच्या बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:26 AM2022-07-31T05:26:08+5:302022-07-31T05:26:33+5:30
विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव शनिवारी सलग पाचव्या दिवशी सुरू राहिला. आतापर्यंत ५जी स्पेक्ट्रमसाठी कंपन्यांनी १,४९,८५५ कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ५जी स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांत तीव्र स्पर्धा असल्यामुळे लिलाव प्रक्रिया पाचव्या दिवसांपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी कंपन्यांनी २४ व्या फेरीसाठी बोली लावल्या आहेत. शुक्रवारपर्यंत लिलावाच्या २३ फेऱ्या झाल्या होत्या.
दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी म्हटले होते की, विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे. लिलावास कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे. या लिलावात दूरसंचार विभागाने ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विक्रीसाठी ठेवले आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एयरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्राइजेस या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. लिलावात विकल्या जाणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमची वैधता २० वर्षांची असेल. लो फ्रिक्वेन्सी बँड, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी बँड रेडिओ वेव्हजचा हा लिलाव आहे. यात यशस्वी झालेल्या कंपन्या ५जी दूरसंचार सेवा देतील.
बयाणा रक्कम जमा
दूरसंचार विभागाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ५जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी व्होडाफोन आयडियाने २,२०० कोटी रुपये, भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, अदानी डेटा नेटवर्क्सने १०० कोटी रुपये आणि रिलायन्स जिओने १,४०० कोटी रुपये बयाणा रक्कम म्हणून जमा केले आहेत.