Google Play स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा बनावट अॅप्स; तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:07 AM2019-06-26T10:07:22+5:302019-06-26T10:07:53+5:30
या अशा बनावट अॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो.
नवी दिल्ली - एका संशोधनानुसार गुगल प्ले स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक बनावट अॅप्स आहेत. यूनिवर्सिटी सिडनी एन्ड सीएसआयआरओ डेटा 61 ने गेल्या 2 वर्षाच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे की, प्ले स्टोअरमध्ये अनेक असे प्रसिद्ध अॅप्स आहेत ज्यांचे बनावट व्हर्जन उपलब्ध आहेत. टेंपल रन, फ्री फ्लो आणि हिल क्लाइंब रेसिंगसारखे अनेक अॅप्सचे बनावट व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. या अभ्यासात 12 लाख अॅप्सची तपासणी करण्यात आली आहे.
असे बनावट अॅप्स ओळखणं कठीण
अभ्यासात नमूद केलं आहे की, हे बनावट अॅप्स खऱ्या अॅप्स सारखे दिसत असून यात अनेकदा मोबाईल ग्राहकांकडून गडबड होते. बनावट अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ते कळून येतात पण डाऊनलोड न करता तांत्रिक तज्ज्ञाशिवाय कोणालाही हे अॅप्सओळखतादेखील येणार नाहीत.
मोबाईल ग्राहकांचा डेटा चोरण्याचा धोका
अभ्यासात स्पष्ट केलं आहे की, या अशा बनावट अॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अॅप्सच्या वापरामुळे मोबाईल युजर्सना आर्थिक नुकसान तसेच डेटा चोरी होण्याचा धोका कायम असतो.
याविषयी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या उत्तरात गुगलने सांगितले की, जेव्हा आम्हाला कधी मोबाईल युजर्सकडून अशाप्रकारची तक्रार येते किंवा कोणताही अॅप्स गुगलने दिलेल्या पॉलिसीचं उल्लंघन करत असेल तर आम्ही तातडीने ते अॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो.
प्ले स्टोअरमध्ये 2040 अॅप्स बनावट
अभ्यासात समोर आलं आहे की, जवळपास 2 हजार 40 अॅप्स असे आहेत की ते प्रसिद्ध असलेल्या 10 हजार अॅप्ससारखेच दिसतात. यातील 49 हजार 608 अॅप्सचं उद्दिष्ट युजर्सच्या मोबाईलवर परिणाम करणे हे असते. तसेच 1 हजार 565 अॅप्स अशी परवानगी मागतं ती खरे अॅप्सही मागत नाही. त्यामुळे अशा अॅप्सपासून सावधान राहणे गरजेचे आहे अन्यथा तुमचा मोबाईलही हॅक होऊ शकतो.