फेसबुकवर 20 कोटी बनावट खाती असल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 09:03 AM2018-02-05T09:03:28+5:302018-02-05T09:03:53+5:30
फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई- फेसबुकचा सगळीकडेच वारेमाप वापर केला जातो. फेसबुकचा वापर न करणाऱ्या व्यक्ती क्वचितच सापडतील. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण फेसबुकचा वापर करतात. याच सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 कोटी बनावट खात्यापैकी बरीच खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांमधील आहेत. फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीत ही आकडेवारी उघड झाली. गेल्या काही वर्षांत फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
३१ डिसेंबर २०१६ अखेर फेसबुकचे १.८६ अब्ज वापरकर्ते (मंथली अॅक्टिव्ह युजर्स -मासिक सक्रिय वापरकर्ते) होते. त्यापैकी सहा टक्के, म्हणजे ११४ दशलक्ष खाती बनावट होती. पुढील वर्षांत एकूण वापरकर्ते आणि बनावट खात्यांमध्येही मोठी वाढ झाली. ३१ डिसेंबर २०१७ अखेर जगात फेसबुकचे २.१३ अब्ज वापरकर्ते (मंथली अॅक्टिव्ह युजर्स) होते. १० टक्के खाती बनावट असल्याचं समोर आलं.
खोट्या किंवा बनावट खात्यांची नेमकी संख्या मोजणं अवघड आहे. त्यांचा साधारण अंदाज लावता येऊ शकतो. सध्या जगातील २० कोटी खाती बनावट किंवा खोटी असल्याचा फेसबुकचा अंदाज आहे. प्रत्यक्ष आकडा यापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकतो, असं फेसबुकचं म्हणणं आहे.
मंथली अॅक्टिव्ह युजर्सबरोबरच डेली अॅक्टिव्ह युजर्सही (दैनंदिन सक्रिय वापरकर्ते) गेल्या वर्षांत बरेच वाढले आहेत. जगात २०१६ साली फेसबुकचे १.२३ अब्ज डेली अॅक्टिव्ह युजर्स होते. २०१७ साली त्यात १४ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या १.४० अब्ज डेली अॅक्टिव्ह युजर्सवर गेली. फेसबुकच्या या प्रसारामध्ये भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा देशांतील नागरिकांनी मोठा सहभाग आहे.