3 वर्षे तुरुंगवास अन् 2 लाखांचा दंड; जास्त SIM Card वापरल्याने अडचणीत याल, पाहा नियम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:50 PM2024-07-16T14:50:07+5:302024-07-16T14:52:12+5:30
एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड असावेत, यासाठी सरकारने विशेष नियम बनवले आहेत.
SIM Rules Under Telecom Act : भारतात नवीन दूरसंचार कायदा 2023 (Telecom Act) लागू करण्यात आला आहे. या कायद्याद्वारे कॉलवर होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने अनेक कठोर नियम केले आहेत. एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड असावेत, याचीही विशेष काळजी यात घेण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर या कायद्याद्वारे कडक कारवाई केली जाणार आहे.
किती सिम कार्ड मिळणार?
दूरसंचार कायदा 2023 नुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावावर किती सिम कार्ड मिळू शकतात, हे त्याच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून आहे. जर एखादी व्यक्ती जम्मू-काश्मीर, आसाम आणि भारताच्या ईशान्येकडील परवानाकृत सेवा क्षेत्रांमध्ये (LSA) राहत असेल, तर तो फक्त सहा सिम घेऊ शकतो. हा परिसर संवेदनशील असल्याने येथे मर्यादा कमी ठेवण्यात आली आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त, देशातील इतर ठिकाणच्या लोकांना त्यांच्या नावावर 9 सिम कार्ड मिळू शकतात.
नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई
नवीन नियमांनुसार, जर कोणी नियमापेक्षा जास्त सिम कार्ड घेतले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आरोपीला दूरसंचार कायद्यांतर्गत 50,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. एवढंच नाही, तर आरोपीने असे वारंवार केल्यास त्याला दोन लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. एखाद्या व्यक्तीने फसवणूक करुन सिमकार्ड मिळवले, तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
तुमच्या नावावर इतर कोणी सिम वापरत आहे का?
बऱ्याच वेळा असे घडते की, सायबर फसवणूक करणारे तुमच्या नावाचे सिम वापरतात, परंतु तुम्हाला याची माहितीही नसते. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला www.sancharsathi.gov.in या सरकारी पोर्टलवर जावे लागेल आणि तेथे आवश्यक माहिती भरल्यानंतर फोनवर OTP येईल. हा ओटीपी भरल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व मोबाइल नंबर दिसतील.