४३ लाख ग्राहकांचा मोबाइल पोर्टेबिलिटीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:05 AM2019-08-25T06:05:58+5:302019-08-25T06:06:46+5:30
जून महिन्यातील आकडेवारी । कर्नाटक राज्यातील ग्राहकांनी घेतला एमएनपी सेवेचा सर्वाधिक लाभ
खलील गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोबाइल क्रमांक कायम ठेवून मोबाइल कंपनीची सेवा बदलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)साठी जून महिन्यात देशभरातील ४३.४ लाख ग्राहकांनी अर्ज केला होता. एमएनपी सेवा सुरू झाल्यापासून या सेवेचा आतापर्यंत ४४.१४९ कोटी ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे ही सेवा देशभरातील मोबाइल ग्राहकांच्या पसंतीस पडल्याचे चित्र आहे.
जून महिन्यात एमएनपी सेवेचा सर्वाधिक लाभ कर्नाटक राज्यातील ४.०७७ कोटी ग्राहकांनी घेतला. त्याखालोखाल या सेवेचा लाभ आंध्र प्रदेशमधील ३.७३१ कोटी ग्राहकांनी घेतला. तामिळनाडूतील ३.७१९ कोटी ग्राहकांनी, राजस्थानच्या ३.४७२ कोटी, महाराष्ट्राच्या ३.२५ कोटी, मुंबईच्या २.२५३ कोटी, पश्चिम बंगालच्या २.२०४ कोटी, मध्य प्रदेशच्या २.८९४ कोटी तर गुजरातच्या २.९४४ कोटी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
याचप्रमाणे आसामच्या ३४ लाख ५० हजार ग्राहकांनी, हिमाचल प्रदेशच्या २१ लाख ५० हजार, तर जम्मू-काश्मीरच्या १० लाख ९० हजार ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मे महिन्यात ४३.७१५ कोटी ग्राहकांनी एमएनपी सेवेचा पर्याय वापरला होता. त्यामुळे एमनपी सेवेला देशभरातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ब्रॉडब्रँड सेवा वापरणारे ग्राहक वाढले
ब्रॉडब्रँड सेवा वापरणाऱ्यांमध्ये मे महिन्याच्या तुलनेत १.३८ कोटी ग्राहकांची भर पडली आहे. मे महिन्यात ब्रॉडब्रँड सेवा वापरणाºया ग्राहकांची संख्या ५८.१५१ कोटी होती ती जूनमध्ये वाढून ५९.४५९ कोटी ग्राहक एवढी झाली. ही वाढ २.२५७ टक्के आहे. ब्रॉडब्रँड सेवा पुरवणाºया कंपन्यांपैकी पाच प्रमुख कंपन्यांद्वारे तब्बल ९८.७२ टक्के ग्राहकांना ही सेवा पुरवली जात आहे. यामध्ये रिलायन्स जिओ ३३१.२६ दशलक्ष ग्राहकांसह प्रथम क्रमांकावर, भारती एअरटेल १२१.४९ दशलक्ष ग्राहकांसह दुसºया क्रमांकावर तर व्होडाफोन आयडिया ११०.५२ दशलक्ष ग्राहकांसह तिसºया क्रमांकावर आहे. याशिवाय बीएसएनएलचे २१.९३ दशलक्ष व टाटा टेलिसर्व्हिसेसचे १.७६ दशलक्ष ग्राहक आहेत. दूरसंचार नियामक आयोगाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.