4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

By हेमंत बावकर | Published: January 20, 2021 12:41 PM2021-01-20T12:41:27+5:302021-01-20T12:50:36+5:30

Want to Buy 5G Smartphone or 4g better choice : बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...

4G or 5G? Which smartphone to buy? Are you confused, read this ... | 4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

googlenewsNext

- हेमंत बावकर


भारतात सध्या 5G तंत्रज्ञानाची चर्चा आहे. सध्या केवळ चर्चाच आहे, बरं का. परंतू बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...


एक उदाहरण घेऊया, पती-पत्नीकडे सध्या दोन 4G फोन आहेत. परंतू पत्नीला नवीन फोन घ्यायचा आहे, मग नवीन तंत्रज्ञानाचा घ्यायचा की सध्या सुरु आहे त्या 4जीचा. 4जी फोन 6000 रुपयांपासून सुरु आहेत. तर 5जी चे फोन 20000 रुपयांपासून. भविष्याचा विचार करता तिप्पट पैसे घालून 5जीचा फोन घेणे परवडेल का? की त्यापेक्षा 9 ते 10 हजारांत चांगला फोन घेतला तर परवडेल असा प्रश्न पतीराजांच्या मनात घोळत आहे. पतीराज म्हणतायत ५जी आणि पत्नी म्हणतेय कशाला एवढे पैसे खर्च करताय, ४जीच घ्या. आता गणित समजून घेऊया.


 साधारण चार वर्षांपूर्वी 4जी ला सुरुवात झाली. पुणे, मुंबईसारख्या शहरांत पहिल्यांदा ट्रायल म्हणून देण्यात येत होते. ग्रामीण महाराष्ट्रात 4जी यायला साधारण दीड-दोन वर्षे गेली. मग अजून 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला नसताना, मुंबई-पुण्यात आलेले नसताना आणि त्यापलीकडे जाऊन अद्याप कंपन्यांची चाचणी प्रक्रिया सुरु झालेली नसताना 5 जी फोन घेणे परवडणारे असेल का, नाही ना. अजून शहरातच आले नाही तर गावात कुठून येणार, हा प्रश्न देखील आहेच. 


यामुळे जर नवीन फोन घ्यायचा असेल तर गावातील लोकांना 4जी शिवाय पर्याय नाही. जसे ४जी फोन स्वस्त झाले तसे ५जी फोनही स्वस्त होतील. कारण गेल्या आठवड्यात कमी किंमतीच्या 4जी फोनसाठी जो चिपसेट लागतो तसाच चिपसेट 5जीसाठी विकसित झाला आहे. मग आता 20000 ते 50000 रुपयांचे 5G स्मार्टफोन विकत घेऊन ते पुढील वर्षभर 4जीसाठी वापरणार आणि वर्षभराने त्या फोनची किंमत निम्मी होणार, या व्यवहारात काय हशील. कदाचित सहा महिन्यांनी आणखी काहीतरी नवीन फिचर असलेले फोन 20000 हजारात मिळू शकतील. 


देशात 5G चे इन्फ्रास्ट्रक्चर कधीपर्यंत उपलब्ध होईल, स्पेक्ट्रम लिलाव परवडणारे असतील की नाही, कंपन्या स्पेक्ट्रम घेतील की नाही हे देखील माहिती नाहीय. 5G चे नेटवर्क उभारण्यासाठी जो पैसा लागेल तो कुठून येणार हा देखील एक या महामंदीच्या काळातला मोठा प्रश्नच आहे. कंपन्यांनाही माहिती नाहीय की यातून फायदा होईल की नाही. व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल या कंपन्या सध्या लॉस मध्ये आहेत. एकटी जिओच फायद्यात चाललेली आहे. बीएसएनएलकडे तर अद्याप ४जी देखील आलेले नाही. 


शहरांमध्ये ५जी उपयुक्त?
5G चे नेटवर्क जरी शहरात आले तरीही ते हाय स्पीड असल्याने अडथळे पार करू शकणार नाही. यामुळे शहरांतील इमारतींमध्ये हे नेटवर्क जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारावे लागणार आहेत. यासाठीदेखील खर्च मोठा आहे. शहरात हा खर्च भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतीलही. यामुळेच जगभरातही केवळ शहरांतच ५जी नेटवर्क देण्यात येत आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता ग्रामीण काय की शहरी काय, सध्याच्या काळात ५जी फोन न घेता ४जी घेतलेला उत्तम. ५जी नेटवर्क आल्यावरच 5G फोनचा विचार केल्यास फायद्याचे ठरेल. बाकी चारचौघांत मिरविण्यासाठी ५जी फोन घेतल्यास काहीच समस्या नाही. 
 

Web Title: 4G or 5G? Which smartphone to buy? Are you confused, read this ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.