भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?
By सिद्धेश जाधव | Published: August 13, 2021 07:31 PM2021-08-13T19:31:09+5:302021-08-13T19:39:29+5:30
Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का?
भारतात स्मार्टफोन कंपन्यांनी फ्लॅगशिप सेगमेंटनंतर मिडरेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये 5G स्मार्टफोन्स पेरायला सुरुवात केली आहे. बऱ्याचदा भविष्याचा विचार करून आता 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार केला जातो. परंतु देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? पुढे आम्ही आता स्वस्त 5G स्मार्टफोन टाळण्याची काही कारणं दिली आहेत.
5G नेटवर्क उपलब्धतेची निश्चित तारीख ठरली नाही
सध्या एयरटेल, जियो सारख्या टेलिकॉम दिग्गजांनी 5G नेटवर्कच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही 5G च्या उपलब्धतेची निश्चित तारीख किंवा वर्ष देखील सांगितले नाही. सध्या परिस्थिती पाहता निदान या वर्षअखेर देखील 5G नेटवर्क उपलब्ध होणार नाही. त्यामुळे 5G नेटवर्क नसताना 5G स्मार्टफोन्सचा उपयोग तरी काय. आणि 5G उपलब्ध झाले म्हणजे 4G बंद होणार असेही नाही. रिपोर्ट्सनुसार 2026 पर्यंत देशातील 50% लोक 4G नेटवर्क वापरात असतील.
5G नेटवर्क उपलब्ध होईस्तोवर हे स्वस्त 5G फोन्स टिकतील का?
काही लोक कित्येक वर्ष एका स्मार्टफोनवर काढतात, परंतु अनेक स्मार्टफोन युजर्स तीन वर्षापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरत नाहीत. सध्या स्थिती पाहता 2024 पर्यंत देशातील मोठ्या शहरांमध्ये देखील 5G नेटवर्क उपलब्ध होईल कि नाही हे सांगता येत नाही. वेळेनुसार आता विकत घेतलेल्या या स्मार्टफोन्सचा बॅटरी बॅकअप कमी होत जाईल. 5G नेटवर्कवर स्मार्टफोनची बॅटरी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे भविष्याचा विचार करून घेतलेला स्मार्टफोन भविष्यात तसाच राहणार नाही.
5G स्मार्टफोन्सच्या किंमती कमी होणार
येत्या काही वर्षांत 5G सपोर्टेड स्मार्टफोन्सच्या किंमती कमी होतील. सध्या टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे हे फोन्स महाग आहेत. भविष्यात मागणी वाढल्यामुळे तुम्हाला आताच्या किंमतीत चांगले स्मार्टफोन्स मिळू शकतात.
महागडे 5G इंटरनेट प्लॅन्स
जेव्हा 4G भारतात लाँच झालं होतं तेव्हा तेही महाग होतं. 5G च्या बाबतीत देखील तसेच होऊ शकते. सुरुवातीचा काही वर्ष महागडे 5G इंटरनेट प्लॅन्स बघायला मिळू शकतात. सध्या मोफत 4G देणाऱ्या टेलिकॉम कंपन्या आपला खर्च भरून काढण्यासाठी 5G चा वापर करू शकतात. त्यामुळे 5G उपलब्ध असूनही कदाचित तुम्ही 4G इंटरनेट प्लॅन वापरत असाल.
सर्वच स्वस्त गोष्टी मस्त नसतात
सध्या उपलब्ध असलेले स्वस्त 5G स्मार्टफोन प्रोसेसर, बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा अश्या स्पेक्समध्ये तडजोड करत आहेत. 5G फोन आहे म्हणून तो 4G फोन पेक्षा वेगवान असेल असा समज करून घेऊ नका. तुमचा फोन 5G नेटवर्क येईस्तोवर सुस्थितीत राहू शकतो परंतु तोपर्यंत तुम्हाला स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सशी तडजोड करावी लागू शकते.