50th Anniversary of Moon Landing : ‘अपोलो-११’ ते ‘चांद्रयान-२’; जाणून घ्या चंद्रोत्सव देशोदेशीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:28 PM2019-07-20T13:28:45+5:302019-07-20T13:30:53+5:30

चंद्रावर जाण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व मोहिमा या वेगवेगळ्या होत्या

50th Anniversary of Moon Landing: Apollo-11 'to' Chandrayaan-2 '; Know the all moon missions of different countries ! | 50th Anniversary of Moon Landing : ‘अपोलो-११’ ते ‘चांद्रयान-२’; जाणून घ्या चंद्रोत्सव देशोदेशीचा !

50th Anniversary of Moon Landing : ‘अपोलो-११’ ते ‘चांद्रयान-२’; जाणून घ्या चंद्रोत्सव देशोदेशीचा !

googlenewsNext

- प्रमोद काळे, ( संचालक, इंटिग्रेटेड सर्किट अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

भारतासह इतर देशांनी चंद्रावर जाण्यासाठी मोहिमा राबविल्या. मात्र, भारताच्या आणि इतर देशांच्या मोहिमांचा विचार करता, भारताने सर्व बाबींचा अभ्यास करून अत्यंत कमी खर्चात ‘चांद्रयान-१’ मोहीम पूर्ण केली. अमेरिकेने चंद्रावर जाण्याची मोहीम आखली, त्यावेळी थेट चंद्रावर जाऊन उतरायचे निश्चित केले. त्यासाठी अमेरिकेने ‘सॅटर्न फाईव्ह’ या अत्यंत मोठ्या रॉकेटचा वापर केला. अमेरिकेच्या ‘अपोलो मोहिमे’मध्ये तीन अंतराळवीर होते. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. ‘चांद्रयान-२’ मोहिमेत अंतराळवीर नाहीत तर उपकरणे आहेत. त्यामुळे काही तांत्रिक कारणांमुळे या मोहिमेला उशीर झाल्यास काहीही फरक पडत नाही.

चंद्रावर जाण्यासाठी राबविण्यात आलेल्या सर्व मोहिमा या वेगवेगळ्या होत्या. अंतराळात पहिला उपग्रह १९५७ साली सोडला गेला. त्यानंतर लगेचच रशिया, अमेरिकेचे अनेक उपग्रह ‘डिफेन्स’च्या कामासाठी अंतराळात सोडण्यात आले. त्यातही रशियाने पुढाकार घेऊन ‘ल्युना यान’ चंद्राच्या भोवती जाऊन चंद्राच्या प्रतिमा मिळविल्या आणि त्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर १९६० साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांनी चंद्रावरील मोहिमेची घोषणा केली. अमेरिकेनेसुद्धा यात पुढाकर घेऊन अंतराळवीरांना चंद्रावर पाठवून त्यांना जिवंत परत आणायचे, ही मोहीम आखली. त्याचप्रमाणे १९७० च्या आत ही मोहीम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले; तसेच याबाबत विचार करून मोहिमांची आखणी केली. अमेरिकेने पहिली ‘मर्क्युरी मोहीम’ केली. या मोहिमेत एकच माणूस होता. त्यानंतर दुसरी ‘जेमिनी मोहीम’ आखली गेली. जेमिनी मोहिमेची एक शृंखला होती. या दोन्ही मोहिमा पृथ्वीच्या भोवतीच होत्या; परंतु तिसरी ‘अपोलो मोहीम’ चंद्रावर जाण्यासाठी आखण्यात आली होती. त्यासाठी अमेरिकेने ‘ल्युनर ऑर्बिटर’ या नावाचे एक यान तयार केले; तसेच चंद्राच्या भोवती जाऊन या यानाच्या माध्यमातून परत आणले; तसेच चंद्राची काही छायाचित्रे काढून प्रसिद्ध केली. 

पुढील काळात चंद्रावर नेमके काय आहे? हे पाहण्यासाठी अमेरिकेने नवीन मोहीम आखली. त्यानंतर अपोलो आठ, नऊ आणि दहा या मोहिमा चंद्रापर्यंत जाऊन परत आल्या. ‘अपोलो-११’ या मोहिमेत नील आर्मस्ट्राँग, बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे तीन आंतराळवीर होते. या मोहिमेच्या माध्यमातून तिघे चंद्राच्या कक्षेत गेले. चंद्राच्या कक्षेमध्ये ‘लिनल एक्सकर्जन मॉड्यूल यान’ कायम ठेवले. त्यात मायकेल कॉलिन्स होता, तर आर्मस्ट्राँग, बझ अल्ड्रिन हे ल्युनर अ‍ॅसेंटच्या माध्यमातून चंद्रावर उतरले. या मोहिमेतून प्रथमच मानवाने चंद्रावर पाय ठेवला होता. ‘अपोलो-११’ मोहिमेचे प्रक्षेपण १६ जुलै रोजी झाले आणि २० जुलै रोजी हे यान चंद्रावर पोहोचले होते. पुढील काही वर्षे अमेरिकेने अपोलो मोहिमा सुरूच ठेवल्या होत्या. मात्र, काही वर्षांनंतर अपोलो मोहीम पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतरच अमेरिकेने ‘स्पेस शटल’ हा मोठा प्रोग्राम हाती घेतला. आता अमेरिकेने २०२४ मध्ये पुन्हा माणसांना चंद्रावर पाठवायची घोषणा केली आहे.

रशियानेसुद्धा चंद्रावर यान उतरवले होते. चंद्रावर पाठविलेल्या यानाच्या साह्याने तेथील ‘रॉक सॅम्पल’ जमा केले आणि रशियाने यान परत आणले. रशियाने अंतराळात माणूस पाठविला; परंतु चंद्रावर पाठविला नाही. चीननेसुद्धा अशाच प्रकारची मोहीम केली होती. चंद्रावर नेमक्या कोणत्या ठिकाणी यान उतरविले जाणार, हे चीनने निश्चित केले होते. चंद्राची जी दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही, त्या ठिकाणी चीनने आपले यान चंद्रावर उतरविले होते.         

भारताने जेव्हा ‘चांद्रयान-१’ मोहीम राबविण्याचे निश्चित केले, त्यावेळी चंद्रावर उतरायचे नाही; परंतु चंद्राच्या भोवतीच्या कक्षेत जाऊन उपकरणांच्या साह्याने पाहणी व सर्वेक्षण करण्याचे ठरविले, तसेच एक बदल केला व ‘एक मून इम्पॅक्ट प्रोब’ ठेवलेला होता, तो चंद्रावर जाऊन आपटला. त्यानंतर ‘चांद्रयान-२’चे नियोजन करण्यात आले. ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या कक्षेत जाईल. त्याचा एक भाग ‘विक्रम लॅण्डर’ हा बाहेर निघेल तो हळुवारपणे चंद्रावर उतरेल आणि त्यातून एक व्हेईकलसारखा प्रज्ञान रोबट बाहेर पडेल. या रोबटच्या साह्याने चंद्रावरील खनिजांचा आणि बर्फ स्वरूपात असलेल्या पाण्याचा शोध घेतला जाईल.

भारताने ‘चांद्रयान-१’ मोहिमेसाठी ‘पीएसएलव्ही’ हे लहान रॉकेट वापरले आणि कमी खर्चात मोहीम पूर्ण केली. त्यासाठी सुरुवातीला ‘चांद्रयान-१’ पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावून हळूहळू त्याची कक्षा वाढविण्यात आली. त्यानंतर यान शेवटी चंद्रापर्यंत जाऊन पोहोचले. भारताने या मोहिमेचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यामुळे आपण ‘चांद्रयान-१’ मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. रशियाकडून रोव्हर व लॅण्डरसाठी वापरलेले तंत्रज्ञान एका मोहिमेत अपयशी ठरले. त्यामुळे रशियाने आपल्याला रोव्हर व लॅण्डर देण्यास असमर्थता दर्शविली. परिणामी, ‘चांद्रयान-२’साठी लागणाऱ्या सर्व बाबी आपल्याला कराव्या लागल्या. त्यामुळे चांद्रयान मोहिमेला उशीर झाला.

Web Title: 50th Anniversary of Moon Landing: Apollo-11 'to' Chandrayaan-2 '; Know the all moon missions of different countries !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.