5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:16 AM2019-06-04T10:16:03+5:302019-06-04T10:17:10+5:30
देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे.
नवी दिल्ली : देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे. येत्या 100 दिवसांत 5 जी सेवेची चाचणी सुरु होणार असल्याची घोषणा दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताना केली. तसेच स्पेक्ट्रम लिलावही या वर्षीच केला जाणार असून अद्याप हुवाई कंपनीच्या सहभागाबाबत सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील एक लाख गावांना डिजिटल बनविण्याचे लक्ष्य असल्याचे प्रसाद म्हणाले. टेलिकॉम उत्पादन वाढविण्यासोबतच तोट्यात असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
मनोज सिन्हा यांनी हे मंत्रालय गेली तीन वर्षे हाताळले होते. एक लाख गावांना डिजिटल करण्यासाठी पाच लाख वाय फाय स्पॉट तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, ई-हॉस्पिटल, ई-स्कॉलरशिप सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळेल. तसेच भारतनेट या ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड सुविधा देण्याच्या कामात वेग आणणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
5 जी चाचणीसोबत स्पेक्ट्रम लिलाव आणि लायसन्सची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, यासाठी कंपन्यांना ही सुविधा समाजातील वंचित लोकांपर्यंत पोहोचविण्याची अट असणार आहे. परदेशी कंपन्या लिलावात भाग घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच 5 जी सेवेमध्ये अग्रेसर असलेली कंपनी हुवावे भारतात सहभागी होईल का यावर अद्याप कल्पना नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. या कंपनीच्या एका उपकंपनीवर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका बसल्यास हुवाईची उपकरणे भारतात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.