भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:40 PM2022-10-15T18:40:16+5:302022-10-15T18:40:23+5:30
भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय.
5G network in India: भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. पण, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतोय. तो म्हणजे, त्यांच्या जुन्या फोनमध्ये 5G चालेल का? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये, ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक युजर्सच्या 5G स्मार्टफोनमध्येही 5G नेटवर्क येत नाहीये.
भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरू केली आहे. पण, आता 4G स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात प्रश्न येतोय की, त्यांना जुन्या फोनवर 5G चा लाभ मिळेल का? किंवा त्यांना आता नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल का?
जुना फोन निरुपयोगी होईल?
लवकरच संपूर्ण भारतात 5G सर्व्हिस सुरू होणार आहे. पण, 4G फोन वापरणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण, 5G नेटवर्कवर आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन आरामात वापरू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळू शकते.
भारतभर 5G सेवा कधी मिळणार?
भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि तीही पूर्णपणे नाही. युजर्सना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत. देशभरात 5G सेवा मिळण्यास मार्च 2024 पर्यंत वेळ लागेल. जिओने एका निवेदनात म्हटले की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तर, एअरटेलचे म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल.