5G सिग्नलनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली! अमेरिकेत विमाने विलंबाने किंवा रद्द होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:32 AM2023-07-02T10:32:47+5:302023-07-02T10:33:10+5:30
गेल्या आठवड्यात खराब हवामानामुळे जवळपास ९००० फ्लाईट्स रद्द करण्यात आली होती. तसेच हजारो फ्लाईट्स ठरलेल्या वेळेनुसार झेपावू शकली नव्हती.
जेव्हा जगात ५जी तंत्रज्ञान आले तेव्हा पर्यावरण प्रेमी तज्ञांनी या सिग्नलचे घातक परिणाम होतील असा अंदाज वर्तविला होता. अनेकांनी पक्षी, प्राणी यांच्यासह मानवजातीला धोका पोहोचू शकतो असे म्हटले होते. अशातच या ५जी सिग्नलनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील विमान प्रवाशांसाठी नवीन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विमानसेवा उशिरा किंवा रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या आठवड्यात खराब हवामानामुळे जवळपास ९००० फ्लाईट्स रद्द करण्यात आली होती. तसेच हजारो फ्लाईट्स ठरलेल्या वेळेनुसार झेपावू शकली नव्हती. आता 5G नेटवर्कमुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक देश आता विमानतळांजवळ नवीन फाईव्ह जी सिस्टिम लावत आहेत. एव्हिएशन ग्रुपने गेल्या काही वर्षांपासून याचा इशारा दिलेला आहे. ५जी चे सिग्नल्स विमानांमधीय यंत्रणा खराब करू शकतात. रेडिओ वेव्हज वापरणारी उपकरणे बिघड़ण्याची शक्यता आहे. या उरकरणांमुळे विमान किती उंचीवर उडत आहे याची माहिती मिळत असते. यामुळे कमी दृष्यमानता असल्यास या परिस्थितीत विमाने धावपट्टीवर उतरविण्यात या उपकरणांची महत्वाची भूमिका असते.
गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी 5G नेटवर्क सुरू केले तेव्हा हजारो उड्डाणे प्रभावित झाली होती. यानंतर या कंपन्यांनी विमानतळांजवळील सिग्नलची ताकद कमी करण्याचे मान्य केले होते. यामुळे विमान कंपन्यांना त्यांची विमाने अपग्रेड करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळाला. क्रू 5G चे परिणाम हाताळण्यास सक्षम असतील, परंतु ज्या प्रकारे वायरलेस परवाने दिले जातात त्यामुळे विमान वाहतुकीसाठी अनावश्यक धोका निर्माण झाला आहे, असे अमेरिकेतील सर्वात मोठ्या पायलट युनियनच्या नेत्याने सांगितले. ज्या विमानांना अपग्रेड केले गेले नाहीय त्यांना उड्डाणांवेळी समस्या येऊ शकते, असे परिवहन सचिव पीट बुटिगीग यांनी म्हटले आहे.